राज्याचे सहकार मंत्री अन् सातार्‍याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील कोरोना पॉझिटिव्ह, हॉस्पीटलमध्ये केलं दाखल

कराड : पोलीसनामा ऑनलाइन  –  महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यात राजकीय नेत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांना याची बाधा झाली आहे. आता राज्याचे सहकार मंत्री आणि साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यांना उपचारासाठी कराडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे सातारा जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढणाऱ्या प्रादुर्भावावर व यंत्रणेवर लक्ष असायचे. यातून ते नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान, त्यांचा कोरोनाचा अहवाल सकारात्मक आल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सध्या बाळासाहेब पाटील यांची तब्येत ठीक असून, त्यांच्यावर व्यवस्थित उपचार सुरु आहेत. काळजी करण्याची गरज नसल्याची माहिती कृष्णा विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी दिली.

तसेच पाटील यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची यादी बनवण्याचं काम सुरु असून, जर कोणी संपर्कात आले असेल. त्यांनी स्वतःहून विलगीकरण व्हावे अथवा समोर येऊन माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आलं आहे. यापूर्वी अशोक चव्हाण, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे यांना देखील कोरोनाची बाधा झाली होती. मात्र, उपचारानंतर त्यांनी कोरोनावर मात केली आहे.

राज्यातील ४ लाख रुग्ण झाले बरे

राज्यात शुक्रवारी १२,६०८ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून ३६४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १०४८४ रुग्णांना शनिवारी उपचारानंतर सोडून देण्यात आलं आहे. राज्यातील एकूण कोरोना संसर्गित रुग्णांचा आकडा ५ लाख ७२ हजार ७३४ वर गेला. त्यात तब्बल ४ लाख १ हजार ४४२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात १ लाख ५१ हजार ५५५ सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात १९ हजार ४२७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्याचा रिकव्हरी रेट हा ७०.०९ टक्के एवढा आहे.