Coronavirus : मुख्यमंत्र्यांच्या बाजूच्या बंगल्यातच सापडला ‘कोरोना’चा रूग्ण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात गेल्या चोवीस तासांत सर्वाधिक १६९२२ रुग्णांची वाढ झाली आहे. पहिल्यांदाच प्रतिदिन रुग्णवाढ १६ हजारांपेक्षा जास्त नोंदवण्यात आली असून, चोवीस तासांमध्ये ४१८ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण रुग्णांची संख्या ४ लाख ७३ हजार १०५ झाली आहे. महाराष्ट्रात सुद्धा कोरोना संसर्गित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेला परिसरही यामधून सुटलेला नाही. काही दिवसांपूर्वी वांद्रे येथील ‘मात्रोश्री’ निवासस्थानाच्या परिसरातील चहावाल्याचा कोरोना संसर्गित अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तेव्हा त्याच्या संपर्कात आलेल्या १३० पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आलेलं होत. त्यातील तीन पोलिस कर्मचाऱ्यांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला होता.

आता कलानगरमधील मातोश्री बंगल्याच्या बाजूला असलेल्या एका बंगल्यात कोरोना संसर्गित रुग्ण सापडल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर बंगला सील करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे. यापूर्वी सुद्धा मातोश्रीवरील कुत्र्याचा सांभाळा करणाऱ्या कर्मचाऱ्यास कोरोना संसर्गाची लागण झाली होती. कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर संपूर्ण मातोश्री बंगला सॅनिटाईझ करण्यात आला होता.

तसेच उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबातील अन्य सदस्य या कर्मचाऱ्याच्या थेट संपर्कात आले नसल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु, ठाकरे कुटुंबीयांना आवश्यक ती काळजी घेण्यास सांगितले होते. दरम्यान, राज्यात बुधवारी ३,८९० नव्या कोरोना संसर्गित रुग्णांची नोंद झाली असून, २०८ जणांचे मृत्यू झाले आहे. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १ लाख ४२ हजार ९०० झाली असून ६,७३९ मृत्यूची नोंद आतापर्यंत नोंदवण्यात आली आहे. तर ७६ हजार ७९२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून, ६२ हजार ३५४ रुग्णांवरती सध्या उपचार सुरु आहेत.