Coronavirus : ‘कोरोना’मुळे जगभरातील परिस्थिती आणखी बिघडतेय, WHO नं दिला ‘गंभीर’ इशारा

संयुक्त राष्ट्र : पोलीसनामा ऑनलाइन  –  चीनमधून जगभरात पसरलेला कोरोना अजूनही अटोक्यात येण्याची चिन्ह दिसत नाहीत. लॉकडाऊन, टेस्ट, सोशल डिस्टन्सिंग असे प्रतिबंध अवलंबले जात असले तरी अनेक देशात कोरोनाच्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. संपूर्ण जगात कोरोना रूग्णांची संख्या 71 लाखांच्या पुढे गेली आहे. तर आतापर्यंत 4 लाख लोक मृत्युमुखी पडले आहेत. अजूनही मृत्यूंची संख्या वाढतच आहे. त्यातच आता जागतिक आरोग्य संघटनेने एक गंभीर इशारा दिला असून यामुळे जगाची चिंता आणखी वाढली आहे.

अनेक देशात लॉकडाऊन शिथिल करण्यात येत असतानाच डब्ल्यूएचओने जगभरात कोरोनाची स्थिती बिघडत चालल्याचे म्हटले आहे. रविवारी सर्वाधिक कोरोना रूग्णांची नोंद झाल्याचे डब्ल्यूएचओने सांगितले. दरम्यान, जगभरात कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी वॅक्सीनचा शोध घेतला जात आहे, मात्र त्यामध्ये अद्यापी यश आलेले नाही. सर्वत्र युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस एदनहोम गेब्रेयासिस यांनी सांगितले की, युरोपातील परिस्थिती सुधारत आहे. परंतु, जगभरात कोरोनामुळे परिस्थिती बिघडली आहे. मागील 10 दिवसांत कोरोनाची एक लाख प्रकरणे समोर आली आहेत. रविवारी सुमारे 1 लाख 36 हजार लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झोल आहे. ही आतापर्यंतची एका दिवसातील सर्वाधिक आकडेवारी आहे. रविवारच्या या आकडेवारीतील 75 टक्के रुग्ण हे एकूण 10 देशांमधील होते. यामध्ये अमेरिका आणि दक्षिण आशियाची आकडेवारी सर्वात जास्त आहे.

कोरोनाची लक्षणे नसलेल्या अनेक व्यक्तीची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे. लक्षणे नसलेल्या रुग्णांकडून कोरोना व्हायरसचा प्रसार होतो का? याबाबत डब्ल्यूएचओने खुलासा केला आहे, यामध्ये म्हटले आहे की, असिम्प्टोमॅटिक म्हणजेच लक्षणे नसलेल्या रुग्णांपासून कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका कमी आहे. दररम्यान, जॉर्ज फ्लॉयड मृत्यूप्रकरणावरुन अमेरिकेत सध्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनकर्त्यांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.