Coronavirus : ‘कोरोना’वर कधी कंट्रोल मिळवता येणार ? केंद्रीय मंत्र्यांनी दिली ही महत्वाची माहिती

पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात कोरोनाचा हाहाकार माजला असताना, देशातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. मागील काही दिवसांपासून देशात ७० हजारांच्या वरती रुग्ण आढळून येत असल्याने लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. अशात केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे.

देशात सातत्याने कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या वाढत असताना उपचारानंतर बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच कोरोनाच्या लढ्यात एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. दिवाळीपर्यंत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात केंद्र सरकार आणि आरोग्य विभागाला मोठं यश मिळेल, असा विश्वास डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केला आहे. तसेच २०२० च्या अखेरीस कोरोनाची लस उपलब्ध होईल, असे सुद्धा त्यांनी म्हटलं आहे.

देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येने ३६ लाखांचा टप्पा पार केला आहे. तर मृतांची संख्या ६५ हजारांच्या आसपास पोहोचली आहे. कोरोनाने आपल्याला एक गोष्ट शिकवली. आपल्या जीवनशैलीत बदल घडवून आणला. आरोग्याबाबत अधिक सतर्क आणि सावध राहायला हवं. या वर्षांच्या अखेरपर्यंत कोरोनाची लस बाजारात उपलब्ध होईल, अशी माहिती डॉ. हर्षवर्धन यांनी दिली.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु असताना कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. देशात गेल्या सात दिवसांमध्ये ५,७६,१६६ रुग्णांची नोंद करण्यात आली. जगभरात सात दिवसांत असलेल्या रुग्णसंख्येत भारतातील संख्या ही सर्वाधिक आहे. कोरोनामुळे अनेक राज्यात सुद्धा गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली, कर्नाटक आणि तामिळनाडूत रुग्णांची संख्या ही वारंवार वाढत आहे.