अवघड झालं ! पान मसाल्याची ‘तलफ’ आली म्हणून ‘कोरोना’बाधित रुग्ण रुग्णालयातून पसार

 नवी दिल्ली- उत्तर प्रदेशच्या आग्रा येथे पान मसाल्याची तलफ आल्याने एका कोरोनाबाधित रुग्णाने रुग्णालयातून पळ काढल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णालयातील कंट्रोल रूमच्या कॅमऱ्यांना चकमा देत कोरोनाबाधित आयसोलेशन वॉर्डमधून पसार झाल्याने रुग्णालयात एकच खळबळ माजली आहे. त्या रुग्णाची माहिती तातडीने पोलिसांना देऊन त्याचा शोध घेतला.

सध्या देशात कोरोना विषाणूबाधितच्या आकडेवारीने नऊ लाखांचा टप्पा पार केलाय. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाबाधितचे 28 हजार 498 नवे रुग्ण आढळले आहेत तर, 553 जणांचा मृत्यू झाला आहे. देशासह राज्यातील विविध रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. भारतातील कोरोना रुग्णांचा बरे होण्याचे प्रमाण हे 63.02% इतके आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात असून या दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत.