Coronavirus : ‘कोरोना’ लसीबाबत ट्रम्प यांची मोठी घोषणा, म्हणाले – ‘जे अशक्य आहे ते अमेरिकेनं शक्य करून दाखवलंय’

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – जगात सर्वच देश कोरोना विषाणूच्या संकटाचा सामना करत आहेत. कोरोनाबाधितांच्या संख्येने सुमारे दोन कोटींचा टप्पा पार केलाय. तर, सुमारे आठ लाख लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागलाय. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय केले जात आहेत. तसेच कोरोना विषाणूवरील लस आणि औषध शोधण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी याबाबत मानवी आणि इतर वैद्यकीय चाचण्यांना यश आलंय. अशातच कोरोना विषाणूच्या लसीबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठी घोषणा केलीय.

कोरोना विषाणूपुढे अमेरिकेसारखा मोठा देश देखील हतबल झालाय. महासत्ता असलेल्या अमेरिकेत देखील मृतांचा आकडा वाढताना आढळत आहे. अमेरिकेमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या जगात सर्वाधिक आहे. अमेरिकेतील परिस्थिती दिवसेंदिवस कोरोना विषाणूमुळे गंभीर होत आहे. याच दरम्यान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अ‍ॅस्ट्राजेनेकाची लस वैद्यकीय चाचणीच्या तिसर्‍या टप्प्यात पोहोचली आहे, अशी मोठी घोषणा करून याची माहिती दिली आहे.

लसीच्या सर्व चाचण्यांना यश आले तर ही लस कोरोना विषाणूवर अत्यंत प्रभावी ठरणार आहे, असेही राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी या कोरोना लसबाबतची माहिती दिली आहे.

यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचे संशोधक आणि फायजर यांच्या मदतीने तयार करण्यात आलेली अ‍ॅस्ट्राजेनेकाच्या तिसर्‍या टप्प्यात जवळपास 30 हजार लोकांचा समावेश केला आहे. मला सर्वांना सांगताना आनंद होतो की, अ‍ॅस्ट्राजेनेकाची लस वैद्यकीय चाचणीच्या तिसर्‍या टप्प्यात पोहोचली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणाले, जे करणं अशक्य आहे, असे म्हटलं जात होतं ते अमेरिकेने करून दाखवले आहे. लवकरात लवकर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणारी लस विकसित करण्यासाठी सर्वत्र प्रयत्न केले जात आहेत. एका हिंदी वेबसाईटने याचे वृत्त दिले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात असताना कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तर, अनेकजण कोरोना आजारावर मात करण्यात यशस्वी झाले आहेत.