Coronavirus : काँग्रेसचे डी.के. शिवकुमार ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच आहे. रोज नव्याने भर पडणाऱ्या रुग्णांची संख्या ६० हजारांच्या वरती आहे. अशात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि कैलास चौधरी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर या राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण झालेली आहे. दरम्यान, आता काँग्रेसचे ‘संकटमोचक’ अशी ओळख असलेल्या डी. के. शिवकुमार यांचा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे.

कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या डी. के. शिवकुमार यांना कोरोनाची लागण झाली. त्यांना बंगळुरूतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यापूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांना कोरोनाची लागण झाली होती.

कर्नाटकमध्ये काँग्रेसचे वोक्कालिंगा समाजातील डी. के. शिवकुमार हे एक प्रमुख नेते समजले जातात. कर्नाटकात ते डी. के. एस च्या नावाने प्रसिद्ध आहेत. मागील सिद्धरामय्या सरकारमध्ये ते ऊर्जामंत्री होते. २००९ साली डी. के. शिवकुमार यांना काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष बनवण्यात आलं. कर्नाटकमधील सर्वात श्रीमंत उमेदवारांमध्ये डी. के शिवकुमार यांचा समावेश केला जातो. २०१३ मध्ये निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपली २५० कोटींची मालमत्ता असल्याचे सांगितले होते. त्यात आता वाढ होऊन जवळपास ६०० कोटी रुपये इतकी झाली आहे. डी. के. शिवकुमार आज काँग्रेस सोबत असले तरी माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्याविरोधात निवडणूक लढवून त्यांनी राजकारणात पहिले पाऊल ठेवले होते.

देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले

गेल्या २४ तासांत देशात ६० हजार ९७५ नवे रुग्ण आढळले असून, ८४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण रुग्णांची संख्या ३१ लाख ६७ हजार ३२३ झाली आहे. तर सध्या ७ लाख ४ हजार ३४८ रुग्णांवर देशातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याचसोबत आतापर्यंत २४ लाख ४ हजार ५८५ रुग्ण बरे झाले आहेत ही दिलासा देणारी बाब आहे. कोरोना संसर्गामुळे ५८ हजार ३९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.