Coronavirus : रेड, ऑरेंज ‘झोन’साठी आता हिमाचल ‘मॉडेल’, पंतप्रधानांच्या सर्व राज्यांना सूचना

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हिमाचल प्रदेश मॉडेलचा विचार करावा अशा सूचना दिल्या आहे. हिमाचल प्रदेशातील सरकारनं राज्यातील सर्व जनतेची तपासणी करतं ज्यांच्या शरीरात शीतज्वराची लक्षण दिसत होती त्यांच्यावरती औषधोपचार केले. त्यानंतर देखील प्रकृतीत सुधारणा न झालेल्या व्यक्तींची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली. त्यासाठी याच मॉडेलचा वापर करण्यात यावा अशा सूचना मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांना केल्याचं वृत्त ‘द इकॉनॉमिक टाइम्स’नं दिलं आहे.

देशातील सर्व राज्यांनी रेड आणि ऑरेंज झोनमध्ये हिमाचल मॉडेल राबवावं, तसचं नागरिकांच्या घरोघरी जाऊन स्क्रीनिंग करावं, आरोग्य सेतू ऍपच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना कोरोना संसर्गा संबंधित लक्षण सांगावीत व त्यांना प्रोत्साहित करावं, अशा सूचना केंद्रीय अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. हिमाचल प्रदेश सरकारने सांगितल्याप्रमाणे, राज्यातील ७० लाख लोकांची तपासणी पूर्ण झाली आहे. शरीरात इन्फ्लुएंझा सदृश लक्षणं आढळतात का, यासाठी हिमाचल सरकारनं मोठ्या प्रमाणात तपासण्या केल्या.

यासाठी राज्यातल्या सोळा हजार अधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन जनतेच्या तपासण्या केल्याची माहिती हिमाचल प्रदेशचे अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य) आर.डी. धिमन यांनी दिली. तपासणी दरम्यान, १० हजार जणांमध्ये इन्फ्लुएंझा सदृश लक्षणं आढळून आली. यापैकी दीड हजार जणांची प्रकृती औषधांनंतर देखील सुधारली नाही. त्यामुळे त्या सर्वांची कोरोना संसर्ग चाचणी करण्यात आली.

हिमाचल प्रदेश मध्ये सापडलेल्या कोरोना संसर्गित पॉझिटिव्ह ४० रुग्णांपैकी १० रुग्ण सध्याही रुग्णालयात आहे. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. बाकी २९ रुग्णांवर उपचार करून सोडण्यात आले आहे. हिमाचल सरकारनं दर १० लाख लोकांमागे ७०० जणांच्या चाचण्या केल्या. देशातील सर्वाधिक कोरोना चाचण्या घेणाऱ्या (दर दहा लाखांमागील) राज्यांच्या यादीत हिमाचल पुढं असल्याचं दिसत आहे.