Coronavirus : पत्नीचं ‘कोरोना’ सॅम्पल पाठवलं मोलकरणीच्या नावानं, रिपोर्ट आला पॉझिटिव्ह अन्…

भोपाळ : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील सिंगरोली येथील एका सरकारी डॉक्टरवर कोरोना पॉझिटिव्ह पत्नीची माहिती लपवल्याचा आरोप लावण्यात आला आहे. आरोपी डॉक्टरने उत्तर प्रदेशात एका लग्नाला हजेरी लावलेल्या आपल्या पत्नीचे सॅम्पल मोलकरणीच्या नावाने पाठवले. पत्नीमध्ये कोरोनाची लक्षण दिलसल्यानंतर हे सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. आरोपी डॉक्टरने माहिती लपवण्याच्या हेतूने असे केल्याचे सांगण्यात येत आहे. आता या डॉक्टरविरोधात महामारी अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक प्रसार माध्यमांच्या माहितीनुसार, सिंगरोली येथील खुटार आरोग्य केंद्रातील बीएमओ डॉ. अभय रंजन सिंह आपल्या कुटुंबासह उत्तर प्रदेशातील बलिया येथे 23 जून रोजी एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी गेले होते. ते 1 जुलै रोजी परत आले. मात्र, यानंतर स्वत:ला आणि पत्नीला क्वारंटाईन करण्याऐवजी ते काम करतच राहिले. याच दरम्यान त्यांच्या पत्नीत कोरोनाची लक्षण आढळून आली. यानंतर संबंधित डॉक्टरने आपल्या घरातील मोलकरणीच्या नावाने पत्नीचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवले. हे सॅम्पल पॉझिटिव्ह आल्यानंतर डॉक्टरांचे पथक संबंधित मोलकरणीच्या घरी पोहचले. यानंतर आरोपी डॉक्टरने फसवणूक केल्याचे उघड झाले.

डॉक्टरही कोरोना पॉझिटिव्ह

या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर डॉक्टरांचे पथक डॉ सिंह यांच्या घरी पोहचले. यावेळी कुटुंबातील इतर सदस्यांचीही तपासणी केली गेली. यात डॉ. सिंह यांच्यासह कुटुंबातील इतर दोन सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. सिंगरोलीचे बेढन पोलीस ठाण्यात प्रभारी अरुण पांडेय यांनी सांगितले की, महामारी आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते व्हायरस संक्रमणातून बरे झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. सध्या डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्या 33 सरकारी कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. यामध्ये एका उप विभागीय दंडाधिकाऱ्याचाही समावेश आहे.