CoronaVirus News : राज्यात आतापर्यंत 13 लाख 69 हजार रुग्ण ‘कोरोना’मुक्त, बरे होण्याचे प्रमाण 85.86 टक्क्यांवर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना महामारीने सर्वाधिक ग्रस्त असलेल्या महाराष्ट्रासाठी एक दिलासादायक बातमी आहे. राज्यात कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण या महिन्याच्या सुरूवातीपासून वाढत असल्याचे दिसत आहे. राज्यात रविवारी 11,204 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत 13 लाख 69 हजार 810 जण कोरोनातून मुक्त झाल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. याचा परिणाम म्हणून रूग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 85.86 टक्के झाले आहे.

काल दिवसभरात 150 मृत्यू
काल दिवसभरात राज्यात कोरोनाची 9,060 नवी प्रकरणे समोर आली. तसेच 150 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंतची एकुण रूग्णसंख्या वाढून 15 लाख 95 हजार 381 झाली, तर मृत्यूंची संख्या 42,115 झाली आहे. सध्या राज्यात अ‍ॅक्टिव्ह रूग्ण 1 लाख 82 हजार 973 आहेत. तर 24 लाख 12 हजार 921 व्यक्ती घरगुती अलगीकरणात, तर 23 हजार 384 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.

काल मुंबईत सापडले 1600 रूग्ण
रविवारी मुंबईत कोरोनाचे 1,600 रुग्ण सापडले तर 46 जणांचा मृत्यू झाला. एकुण रूग्णांची संख्या वाढून 2 लाख 41 हजार 935 झाली आहे. तर आतापर्यंत एकुण मृत्यू 9,785 झाले आहेत. मुंबईतही रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून रुग्ण दुपटीचा कालावधी तीन महिन्यांवर गेला आहे. कोविडमुक्त रुग्णांचा दर 87 टक्के असून 2 लाख 10 हजार 782 रुग्ण बरे झाले. 11 ते 17 ऑक्टोबर दरम्यान मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 0.77 टक्के नोंदला गेला आहे.