रेल्वे, लष्कराची रुग्णालये वापरण्यास केंद्राची परवानगी, CM ठाकरेंच्या प्रयत्नांना यश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील दोन महिन्यापासून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने अनेक उपाय योजना आखल्या. अनेक कठोर निर्णय घेतले. मात्र, तरीदेखील राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा कमी होताना दिसत नाही. दिवसेंदिवस कोरोना बाधीतांच्या आकड्यामध्ये कमालीची वाढ होत आहे. येत्या काळात गंभीर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेल्वेसह मुंबई पोर्ट, ट्रस्ट, सैन्यासह केंद्राच्या अखत्यारीत येणारी हॉस्पिटलमधील आयसीयू वापरण्याची परवानगी मागितली होती.

केंद्र सरकारने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी मान्य केली आहे. केंद्राने बुधवारी सायंकाळी उशीरा ठाकरे यांच्या मागणीला मान्यता दिली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे. मात्र, यासाठी केंद्राने एक अट घातली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी महाराष्ट्रात सरकारची मागणी मान्य केली असून रेल्वेसह मुंबई पोर्ट ट्रस्ट, सैन्यासह केंद्राच्या अखत्यारित येणारी हॉस्पिटलमधील आयसीयू वापरण्याची परवानगी दिली आहे. मात्र, हे आयसीयू बेड शेवटचा पर्याय म्हणून वापरण्यात यावेत अशी अट घातली आहे.

राज्य सरकारने स्पोर्ट कॉम्प्लेक्स, रुग्णालये, सरकारी इमारतींसह अनेक ठिकाणी कोरोना रुग्णावरील उपचारांची सोय केली आहे. मात्र, भविष्यातील तयारी म्हणून राज्य सरकारने केंद्राकडे ही मागणी केली होती. बुधवारी उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्यासोबत राज्यातील परिस्थितीबाबत चर्चा केली होती. त्यावेळी त्यांनी ही मागणी केली होती.