पुण्यातील ‘उद्योजका’चे मुख्यमंत्र्यांना ‘पत्र’, सुचवला ‘दारु’पेक्षा जास्त ‘उत्पन्न’ मिळवून देणारा ‘पर्याय’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनामुळे देशात लॉकडाऊन सुरु आहे. यामुळे सर्व व्यवहार ठप्प असल्याने केंद्रासह राज्यांचे उत्पन्न बुडाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यांनी आज पासून उत्पन्न सुरु करण्यासाठी दारू विक्रीला परवानगी दिली आहे. यावर पुण्यातील एका उद्योजकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. या पत्रात उद्योजकाने दारूपेक्षाही जास्त उत्पन्न मिळवून देणारा उपाय सुचविला आहे.
पुण्यातील एका रिअल इस्टेट एजन्सीचे मालक संजय डागा यांनी याबाबतचे पत्र उद्धव ठाकरे सरकारला लिहले आहे. यामध्ये त्यांनी सरकारच्या फायद्याचे गणित मांडले आहे. तसेच उद्धव ठाकरेंच्या कामाची स्तुतीही केली आहे. कोणताही प्रशासकीय अनुभव नसताना ज्या धीराने कोरोना संकटाचा मुकाबला करत आहात तो प्रशंसनीय आहे. यावरून महाराष्ट्र सुरक्षित हातात असल्याची खात्री होत असल्याचे डागा यांनी पत्रात म्हटले आहे.

सरकारने आजपासून घेतलेल्या दारू विक्रीच्या निर्णयापेक्षा मालमत्ता विक्री कशी फायदेशीर आहे हे त्यांना पटवून दिले आहे. एखादा 70 लाखाचा फ्लॅट विकला तर स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन आणि जीएसटी असे एकूण 8 लाख रुपये सरकारच्या तिजोरीला मिळतील. मात्र, दारुविक्रीतून ग्राहकामागे 1 हजार रुपये प्रमाणे 8 लाख रुपयांचा महसूल मिळविण्यासाठी 800 लोकांना घराबाहेर पडावे लागणार आहे. मात्र, मालमत्ता विक्रीसाठी केवळ 1 ग्राहक असणार आहे. यावरून जास्त जोखमीचे काय असले याचा तुम्हीच विचार करावा असे आवाहन डागा यांनी केले आहेत.

तसेच डागा यांनी सरकारच्या बंधनातील त्रुटी देखील दाखविल्या आहेत. लॉकडाऊन काळात बिल्डर घरे बांधू शकतो, मात्र विक्रीला परवानगी नाही. असा नियम घातल्यास त्या बिल्डलने पुरवठादार, कंत्राटदार आणि मजुरांना पैसे कोठून द्यायचे असा सवाल त्यांनी विचारला आहे. बिल्डरांनी बँकांनी दिलेल्या कर्जावरील व्याज 2 टक्क्यांनी कमी करावे. अर्थव्यवस्था रिअल इस्टेट क्षेत्रावरच अवलंबून आहे. त्यासाठी बिल्डरांना सवलत मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे.