केंद्र सरकारनं ‘मास्क’ आणि ‘सॅनिटायझर’ बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनो विषाणूचा वाढता प्रभाव बघता केंद्र सरकारने एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. सरकारने मास्क आणि सॅनिटायझरचा समावेश अत्यावश्यक वस्तूंमध्ये केला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे मास्क आणि सॅनिटायझरचा काळाबाजार व साठेबाजी करणाऱ्यांवर आळा बसेल. यासंदर्भात ग्राहक संरक्षण आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने आदेश जारी केला आहे.

कोरोना विषाणूचा प्रभाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे वेगवेगळ्या पातळीवर उपाययोजना करत आहे. मुंबईमध्ये गर्दीच्या ठिकाणी राज्य सरकारकडून मास्क आणि सॅनिटायझर पुरवण्याचा निर्णय महाराष्ट्र्र सरकारने घेतला आहे. त्यानंतर मास्क आणि सॅनिटायझरचा काळाबाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी केंद्र सरकारने त्यांचा समावेश अत्यावश्यक वस्तूंमध्ये केला आहे. यामध्ये सर्जिकल मास्क, एन ९५ मास्कचा समावेश आहे. कोरोनोचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात हा निर्णय घेण्यात आल्याचं केंद्र सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं.

दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशातील ८१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यातील ६४ भारतीय, १६ इटली व १ कॅनडाचा नागरिक आहे. केरळातील ३ व दिल्लीतील ७ जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आल आहे. तसेच कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या संशयितांची संख्या ४००० वर गेली आहे. त्यांच्यावरही डॉक्टरांची देखरेख सुरु असल्याचे आरोग्य मंत्रालयाचे वतीने सचिन अग्रवाल यांनी सांगितले.