‘कोरोना’ व्हायरसनं मृत्यू झाल्यानंतर 50 मृतदेहांवर सामुहिक अंत्यसंस्कार, व्हिडीओ व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या मृतदेहावर हैदराबादच्या एरगडॅडा स्मशानभूमीत सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी आक्रोश केला आहे. जवळपास 50 हून अधिक कोरोनाग्रस्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्याची घटना घडली होती. या घटनेवर तेलंगणाचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. के. रमेश रेड्डी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. वाहतुकीचा आणि मनुष्यबळाचा अभाव असल्यामुळे एकाच ठिकाणी 50 हून अधिक कोरोनाग्रस्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्याचे त्यांनी सांगितले आहे.

तेलंगणात कोरोनाचे थैमान सुरू असून हैदराबादच्या एरगडॅडा स्मशानभूमीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 50 हून अधिक मृतदेहावर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. याचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमुळे नागरिकांनी संतापाची भावना व्यक्त केली होती. तेलंगणा आरोग्य विभागाकडूनही यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आले आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाची ही एका दिवसातली संख्या नव्हती. 3 दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे मृतदेह रुग्णालयात होते. वाहतुकीच्या अभावामुळे हे करण्याची वेळ आल्याचे रेड्डी यांनी स्पष्टीकरण दिले आहे.