प्रयोगशाळांतील स्वॅब टेस्टिंगची क्षमता वाढवावी, महापौर मोहोळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –  महापालिकेने कन्टेंन्मेट झोन तसेच विलगीकरण कक्षांमध्ये स्वॅब घेण्याचे प्रमाण ५०० वरून १५०० पर्यंत वाढविले असले तरी प्रयोगशाळेत एवढ्या मोठ्या संख्येने सॅम्पल तपासणी करण्याची क्षमता नसल्याची नवीन अडचण समोर आली आहे. राज्य शासनाने कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी खाजगी प्रयोगशाळा ताब्यात घेउन सॅम्पल तपासणीची क्षमता वाढवावी, अशी विनंती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना केली आहे.
शहरातील कन्टेंन्मेट झोनसोबतच अन्य भागातही मागील काही दिवसांपासून कोरोनाची बाधा झालेल्या रुग्ण सापडू लागले आहेत. महापालिका व शासकिय रुग्णालयांनी स्वॅब घेण्याचे प्रमाण वाढविल्याने रुग्णसंख्याही वाढत आहे. मागील आठवड्यापासून शहरातील विविध भागातील संशयितांचे स्वॅब घेण्याची संख्या दीड हजार पर्यंत वाढविली आहे. तत्पुर्वी दररोज ५०० सॅम्पल्स घेण्यात येत होती.

शहरात एनआयव्ही या शासकिय प्रयोगशाळेसोबतच खाजगी प्रयोगशाळांमध्ये स्वॅब टेस्टिंग करून त्याच दिवशी अथवा ङ्गारतर दुसर्‍या दिवशी सकाळी अहवाल दिले जात होते. परंतू मागील काही दिवसांपासून सॅम्पल्सची संख्या दीड हजारांपर्यंत वाढविली आहे. या टेस्टमध्ये संशयित पॉझीटीव्ह असल्याचे आढळल्यास त्याच्या संपर्कात आलेल्यांनाही क्वारंटाईन करून त्यांचे स्वॅब टेस्टसाठी घ्यावे लागतात. परंतू सॅम्पल्स वाढल्यानंतर प्रयोगशाळांकडून अहवाल मिळण्यास एक ते दोन दिवस लागत आहेत. त्यामुळे एखादी व्यक्ति पॉझीटीव्ह असेल तर या दोन दिवसांमध्ये तिच्याकडून आणखी संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

एनआयव्हीमध्ये जिल्ह्यातून तसेच पश्‍चिम महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांतूनही सॅम्पल्स तपासणीसाठी येत आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने येणारे सॅम्पल्स तपासणीची सुविधा नसल्याचे एनआयव्हीने कळविले आहे. यामुळे अडचण होत आहे. शहरातील खाजगी लॅब व प्रयोगशाळांतील स्वॅब टेस्टिंगची क्षमता वाढवावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना केल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.