Coronavirus Medicine :राजकारण्यांनी ताब्यात ठेवलेली औषधे आरोग्य विभागाकडे जमा करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – राजकीय नेत्यांनी कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी लागणारी औषधे ताब्यात ठेवल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. ही औषधे आरोग्य खात्याला परत करण्याचा आदेश न्यायालयाने दिला असून या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी कुचराई करत प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला अशा शब्दात पोलिसांवरही न्यायालयाने ताशेरे ओढले.

न्यायालयाने असे म्हंटले आहे की, एखादा नेता लोकांना मोफत औषधे देण्याचे जाहीर करत असेल तर त्याला ही औषधे कोठून मिळतात. असा सवाल करत राजकीय नेत्यांचा जर ही औषधे जनतेच्या हितासाठी असून यात कोणताही राजकीय लाभ मिळवण्याचा हेतू नाही असा दावा असेल. तर मग या मंडळींनी कोरोना उपचारासाठी लागणारी त्यांच्याकडे असलेली औषधे त्वरित आरोग्य विभागाकडे जमा केली पाहिजेत असे म्हंटले आहे.

दरम्यान, न्यायालयाने पोलिसांवरही ताशेरे ओढले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयात कोरोनावरील औषधांचा काळाबाजार व वितरण याबद्दल एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेच्या सुनावणीवेळी दिल्ली पोलिसांनी अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी व्ही यांच्यासह अनेक नेते निःस्वार्थीपणे जनतेला कोरोनावरील औषधांचे वाटप करत आहेत अशी बाजू मांडली मात्र न्यायालयाने हा युक्तिवाद अमान्य केला.