Coronavirus : ‘कोरोना’च्या फैलावाने सरकार अन् आरोग्य विभागाची चिंता वाढवली ! केंद्रीय गृहमंत्रालयाकडून नव्या मार्गदर्शक सूचना जारी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   देशात राजधानी दिल्लीसह इतर राज्यांतही गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने (COVID19) पुन्हा डोके वर काढले आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे सरकारच्या आणि आरोग्य विभागाच्या चिंतेत वाढ झाली असून, वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तसेच कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत.

कोरोना रुग्णांच्या नियंत्रणासाठी आणि खबरदारीचा उपाय म्हणून 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीसाठी या मार्गदर्शक सूचना जारी केल्या (coronavirus-mhas-fresh-guidelines-will-be-effective-december-1-31) आहेत. याचा मुख्य उद्देश कोविड 19 च्या फैलावाला रोखण्याचे आहे. गृहमंत्रालयाने विविध राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना कोरोना रोखण्यासाठीचे उपाय, विविध व्यवहारांवर मर्यादा आणण्याचे, गर्दीला नियंत्रित करण्यासाठी अनिवार्य उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.

केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनांमध्ये कंटेन्मेंट झोनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवांनाच सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. तसेच स्थानिक जिल्हा, पोलीस आणि नगरपालिका अधिकाऱ्यांवर कंटेन्मेंट झोनमध्ये नियमांचे पालन करवून घेण्याची जबाबदारी सोपवली आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सरकार संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणार आहे. तसेच गृहमंत्रालयाने म्हटले आहे की, कोरोनाच्या परिस्थितीच्या आपल्या आकलनाच्या आधारावर राज्य आणि केंद्रशासित प्रदेश केवळ कंटेन्मेंट झोनमध्ये रात्रीच्या संचारबंदीसारखे स्थानिक निर्बंध लागू करू शकतात. मात्र, कंटेन्मेंट झोनच्या बाहेर कुठल्याही प्रकारचा लॉकडाउन लावण्यापूर्वी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतील सरकारांना केंद्र सरकारकडून परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे.