20 कोटी महिलांच्या अकाऊंटमध्ये दरमहा येणार 500 रूपये, मोदी सरकारची मोठी घोषणा

पोलीसनामा ऑनलाइन –  देशात कोरोना व्हायरसचे संकट असताना केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने मोठ्या मदत पॅकेजची घोषणा केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवारी दुपारी १ लाख ७० हजार कोटी रुपयांची मदत घोषित केली असून याअंतर्गत वेगवेगळ्या प्रकारे सामान्य लोकांना मदत पोहोचणार आहे. सरकारकडून देशातील तब्बल २० कोटी महिलांच्या खात्यात पुढचे तीन महिने ५०० रु. प्रति महिना मदत दिली जाईल.

१. पैसे
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी घोषणा केली की, ज्या महिलांचे पंतप्रधान जनधन खात्याअंतर्गत बँक खाते आहे, अशा जवळजवळ २०.५ कोटी महिलांना पुढच्या तीन महिन्यापर्यंत ५०० रु. प्रति महिना मदत केली जाईल. ही रक्कम प्रत्येक महिन्याला सरळ महिलांच्या खात्यात पाठवली जाईल.

२. गॅस
याशिवाय पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत देशात ८ कोटी बीपीएल कुटुंबांना पुढच्या तीन महिन्यापर्यंत मोफत सिलेंडरची व्यवस्था केली जाईल. या योजनेंतर्गत ८.५ कोटी महिलांच्या नावाने गॅस कनेक्शन उघडले गेले होते, आता यांनाच पुढचे तीन महिने मोफत सिलेंडर दिले जातील.

3. अन्न
कोरोना व्हायरसमुळे केल्या गेल्या घोषणेत देशातील सगळ्या लोकांसाठी अन्नधान्याची व्यवस्था केली गेली आहे. पंतप्रधान अन्न योजनेंतर्गत ५किलो अतिरिक्त गहू किंवा तांदूळ पुढचे तीन महिने मिळणार असून याचा फायदा ८० कोटी लाभार्थ्यांना मिळणार आहे.

यासह अर्थमंत्र्यांनी घोषणा केली की, पीएम गरीब कल्याण योजने अंतर्गत महिला सेल्फ हेल्प ग्रुप अंतर्गत ७ कोटी कुटुंबांना फायदा मिळणार आहे, दीन दयाळ राष्ट्रीय ग्रामीण जीविका योजने अंतर्गत त्यांचे मोफत कर्ज वाढवून २० लाख रु. केले जाणार आहे.