Coronavirus : ‘लॉकडाऊन’मुळे काम गेले, पोटाभरण्यासाठी गवत खाण्याची आली वेळ, PM मोदीच्या मतदारसंघातील ‘विदारक’ स्थिती

वाराणसी : वृत्तसंस्था – कोरोनामुळे देशाच्या विकासाची चक्रे थांबली आहेत. यामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. अनेकांच्या हाताला काम नाही. अशा परिस्थितीमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी मोठे पॅकेज जाहीर केले. त्यांनी सर्वकष आर्थिक पॅकेजची घोषणा केली. गरीबांसाठी, कामगारांना तात्काळ मदत देण्यासाठी, ग्रामीण भागातील लोकांना मदत देण्यासाठी 1.7 लाख कोटी रुपयाचे पॅकेज जाहीर केले. हे पैसे नागरिकांच्या थेट खात्यामध्ये जमा होणार आहेत. मात्र, लॉकडाऊनमुळे गरीब अन् हातावर पोट असणाऱ्या नागरिकांची उपासमार होत आहे. वाराणसी येथील एका ठिकाणी नागरिकांनी चक्क गवत खाऊन दिवस काढल्याचे वृत्त आहे.

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत 1.70 लाख कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात आले आहे. कुणीही भुकेला राहू नये आणि हातात पैसेही असावेत, या उद्देशाने केंद्राने मोठे पॅकेज जाहीर केले. मात्र, लॉकडाऊन नंतरची परिस्थिती अत्यंत भीषण आहे. वाराणसीतील मुसहर समाजाला आता कोरोनामुळे त्रस्त व्हावं लागत आहे. वाराणसी येथील कोईरीपुर मुसहर वस्तीत लॉकडाऊनमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील तीन दिवसांपासून या ठिकाणी कोणाच्याही घरात चूल पेटलेली नाही. आपल्या पोटाची भूक भागविण्यासाठी येथील लोकं चक्क गवत खात आहेत. या ठिकाणच्या लोकांकडे मास्क आणि

सॅनिटायझर्स तर लांबच हात धुण्यासाठी साबण देखील नाही. हीच परिस्थिती पिंडरा येथील वस्त्यांवरही पहायला मिळत आहे. घरात अन्न धान्य नसल्याने या ठिकाणच्या नागरिकांच्या घरात चूल पेटलेली नाही.
दरम्यान, हे वृत्त समोर येताच काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी यासंदर्भात ट्विट करून मोदी सरकारवर टीका केली आहे. थरूर यांनी वाराणसीतील विदारक परिस्थिती मांडत, सोचा नही था इतने अच्छे दिन आयेंगे, वाराणसी के लोग भी घास खायेंगे, असे ट्विट थरुर यांनी केले आहे.