Coronavirus : पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 10 लाखांहून अधिक; राजस्थान, गुजरातसह अनेक राज्यांपेक्षा पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या जास्त

पुणे : पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्येने १० लाखांचा टप्पा पार केला आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत १० लाख ३३० जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागातील कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण कमी असले तरी देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त जिल्हा म्हणून पुणे जिल्ह्याचे नाव प्रथम क्रमांकावर आहे.

राजस्थानमध्ये ९ लाख २३ हजार ८६०़ गुजरातमध्ये ७ लाख ९४ हजार ९१२, हरियानामध्ये ७ लाख ४४ हजार ६०२, ओडिशामध्ये ७ लाख १४ हजार ३८०, बिहारमध्ये ६ लाख ९५ हजार ७२६ कोरोना रुग्ण आहेत.

महाराष्ट्रात विशेषत: मुंबई, पुणे, नागपूर शहरात पहिल्यापासूनच कोरोना संसर्ग सर्वाधिक पहायला मिळाला आहे. त्यात मुंबई जिल्ह्यापेक्षा अधिक कहर पुणे जिल्ह्यात आढळून आला आहे.

पुणे जिल्ह्यातील एकूण १० लाख कोरोनाग्रस्तांपैकी एकट्या पुणे शहरात जवळपास निम्मे म्हणजे ४ लाख ६६ हजार ८५८ रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये २ लाख ४७ हजार ७२२ रुग्ण झाले आहेत. ग्रामीण भागात २ लाख १७ हजार ४४५ तसेच नगरपालिकांच्या हद्दीत ५३ हजार ३२७ आणि कँट्रोंनमेंट भागात १४ हजार ९७८ रुग्ण आतापर्यंत सापडले आहेत. पुणे जिल्ह्याने १० लाखांचा टप्पा पार केला असला तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही अधिक आहे. आतापर्यंत ९ लाख ४५ हजार ९७४ जणांनी कोरोनांवर मात केली आहे. जिल्ह्यात सध्या १६ हजार ५७७ जणांवर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत असून २१ हजार ६०० गृहविलगीकरणात आहेत.

गेल्या २४ तासात पुणे शहरात ७३९ रुग्ण आढळून आले असले तरी ग्रामीण भागात त्यापेक्षा अधिक ११६१ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यात एकूण २ हजार ७८६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.