‘कोरोना’ची विळख्यात अडकलेल्या 1000 रूग्णांपैकी 6 जणांचा जीव नाही वाचू शकत : WHO

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जागतिक आरोग्य संघटनेचे महामारी विषेशज्ञ म्हणाले आहेत की, कोरोना संसर्ग झालेल्या लोकांमध्ये मृत्यूचे प्रमाण ०.६ टक्के आहे. महामारी विशेषज्ञ डॉ. मारिया व्हॅन केरखॉव्ह यांनी सांगितले की, हे मूल्यांकन काही अभ्यासांमध्ये केले गेले आहे. त्या म्हणाल्या की, जरी हे फारसे दिसत नसले तरी ते खूप जास्त आहे. कारण दर १६७ पैकी एका व्यक्तीचा मृत्यू होत आहे.

डिसेंबरमध्ये चीनच्या वुहानमधून कोरोना महामारीच्या प्रादुर्भावाने आतापर्यंत जगात ६.९ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच मृत्यू दराचे नवीन मूल्यांकन हे देखील दर्शवते की, जगात आतापर्यंत ११.५ कोटी लोक कोरोनाने बाधीत आहेत. सध्याच्या पुष्टी झालेल्या प्रकरणांपेक्षा हे ७ पट जास्त आहे.

असे समजले जात आहे की, जगात कोट्यावधी लोक आहेत ज्यांना कोरोना संसर्ग झाला, परंतु त्यांची तपासणी होऊ शकली नाही. विशेषत: महामारीच्या सुरुवातीच्या काळात बर्‍याच देशांमध्ये चाचणी क्षमता कमी होती.

तसेच डब्ल्यूएचओच्या टेक्निकल लीड डॉ. मारिया व्हॅन केरखॉव्ह यांनी सांगितले की, कोरोना विषाणूचा मृत्यू दर शोधण्यासाठी वैज्ञानिकांची अनेक पथके काम करत आहेत. त्यांनी असेही म्हटले की, सध्या आम्हाला माहित नाही की प्रत्यक्षात किती लोकांना संसर्ग झाला आहे. मात्र त्या म्हणाल्या की, काही अभ्यासांमध्ये संक्रमित लोकांच्या मृत्यूचे प्रमाण ०.६ टक्के आहे.

पूर्वीच्या काही मूल्यांकनांमध्ये संक्रमित लोकांमध्ये मृत्यूचे प्रमाण ०.८ टक्के सांगितले गेले होते. तसेच केंब्रिज विद्यापीठाच्या शैक्षणिक संस्थांचा असा विश्वास आहे की, हा दर १.४ टक्के देखील असू शकतो.