Corona Virus : ‘या’ शहरांमध्ये झपाट्यानं पसरू शकतो ‘विषाणू’, भारताला ‘कोरोना’ व्हायरसचा सर्वाधिक ‘धोका’

दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना व्हायरसची दहशत पसरली असून प्रत्येक देशाकडून कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. चीनच्या वुहान शहरातून जगभर या व्हारसचा धसका संपूर्ण जगाने घेतला आहे. एकट्या चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे 800 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर आता भारतालाही कोरोना व्हायरसचा सर्वाधिक धोका आहे. कोरोना व्हायरस सर्वात जास्त पसरण्याचा धोका असलेल्या 30 देशांमध्ये भारताचा 17 वा क्रमांक लागतो.

बर्लिनच्या हॅम्बोल्ट युनिव्हर्सिटी आणि रॉबर्ट कोच इन्स्टिट्युटच्या संशोधकांनी एक मॉडेल तयार केले आहे. त्यामध्ये एअर ट्रान्सपोर्टेशन पॅटर्नचं विश्लेषण करून चीनव्यतिरिक्त आणखी कोणत्या 30 देशांना या व्हायरसचा धोका आहे, हे माहित करून घेतले जाऊ शकते. या मॉडेलनुसार भारताचा 17 वा क्रमांक लागतो.

संशोधकांनी केलेल्या मॉडेलनुसार चीनव्यतिरिक्त थायलँड, जपान, दक्षिण कोरिया या देशांमध्ये हा व्हायरस सर्वाधिक पसरला आहे तर भारतातील दिल्ली विमानतळ सर्वाधिक प्रभावीत आहे. त्या खालोखाल देशातील मुंबई आणि कोलकत्ता या दोन शहरांचा समावेश आहे. देशात केरळमध्ये कोरोना व्हायरसचे तीन रुग्ण आढळले असून हे रुग्ण चीनच्या वुहान येथून आले होते. त्यांना स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी राज्यसभेत सांगितले कि, या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी सरकार अनेक उपाययोजना आखल्या जात आहेत. आपण देखील परिस्थितीचा दररोज आढावा घेत आहोत. चीनमधून येणाऱ्यांना सध्याचा व्हिसा आता वैध असणार नाही. तसेच लोकांना चीनचा प्रवास टाळण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळुरूसह देशातल्या 21 विमानतळावर तसेचबंदरांवर प्रवाशांची तपासणी केली जात असल्याचे डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले.