Coronavirus : मुंबईहून गावी आलेल्या इंदापूर तालुक्यातील मायलेकीला ‘कोरोना’ची लागण

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन –  इंदापूर तालुक्यातील शिरसोडी भागात शनिवारी रात्री दोन कोरोना संसर्गित रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही रुग्ण मुंबईहून आले होते. हे दोन्ही रुग्ण एकाच कुटुंबातील असून यात आई (वय ३५ वर्ष) आणि मुलगी (वय ११ वर्ष) या मायलेकींचा समावेश आहे.

चार जणांचे कुटुंब मुंबई वरून गुरुवारी शिरसोडी या भागात आले होते. त्यांची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर लगोलग त्यांनी कुटुंबाचे विलगीकरण करून राहत असलेल्या घराला संसर्ग मुक्त करून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या घशाचे स्त्राव घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्याचा अहवाल शनिवारी रात्री प्राप्त झाला असून, कुटुंबातील चार पैकी दोघांना कोरोना संसर्गाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तर दोघांचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला.

दरम्यान, हे चौघे मुंबईतून ज्या गाडीने प्रवास करून आले, त्या गाडीच्या चालकाची व त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती घेतली जात आहे. या दोन्ही रुग्णांवरती इंदापूर येथे उपचार सुरु असून, या रुग्णांच्या संपर्कांत कोण कोण आले याची चौकशी प्रशासनाकडून केली जात आहे. तसेच त्या सर्वाना स्वतंत्र विलगीकरण कक्षात ठेवले जाणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा पोळ यांनी दिली.

मागील आठवड्यामध्ये इंदापूर तालुक्यातील भिगवनमध्ये एक कोरोना संसर्गित रुग्ण आढळून आला होता. परंतु, उपचारादरम्यान त्या रुग्णाचा मृत्यू झाला होता. पण कोरोना संसर्ग मुक्त असलेल्या इंदापूर तालुक्यात पुन्हा रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.