MP डॉ. अमोल कोल्हेंचे PM मोदींना पत्र, म्हणाले – ‘केंद्राकडे पडून असलेला खासदारांचा 196 कोटींचा निधी द्या’

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. ऑक्सिजन, रेमडेसिवीर, कोरोना लस, बेडचा तुटवडा जाणवत आहे. दुसरीकडे कोरोनामुळे होणारे मृत्यूही वाढले आहेत. असे असताना केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशातच राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. केंद्राकडे पडून असलेला खासदार निधी देण्याची मागणी कोल्हे यांनी पंतप्रधान मोदीकडे केली आहे. दरम्यान खासदार कोल्हे यांनी खासदार निधीचा मुद्दा उपस्थित केल्याने यावरून पुन्हा एकदा राजकारण तापण्याची चिन्हे दिसत असून नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

खासदार अमोल कोल्हे यांनी एक व्हिडिओ शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून खासदार निधी देण्याची मागणी केल्याचे म्हटले आहे. खासदारांना केंद्राकडून 5 कोटींचा निधी मिळतो. मात्र, यापूर्वी न मिळालेला जवळपास 196 कोटींचा खासदार निधी पडून आहे. त्यानंतरच्या वर्षात तो दिला नसल्याचे कोल्हे यांनी म्हटले आहे. सध्याची कोरोनाची स्थिती पाहिली तर प्रत्येक मतदार संघात आरोग्य सुविधा उभारणे गरजेचे आहे. राज्यात 48 खासदार आहेत. जर त्यांना त्यांच्या मतदारसंघासाठीचा निधी दिला, तर संपूर्ण राज्यभरात या माध्यमातून मोठी आरोग्य सुविधा उभा करता येईल. गरज असेल त्यानुसार जम्बो कोविड सेंटर, ऑक्सिजन प्लांट यासाठी हा निधी लोकप्रतिनिधी वारता येईल, त्याद्वारे आरोग्य व्यवस्था बळकट होण्यास मदत होईल, असा विश्वास खासदार कोल्हे यांनी या पत्रातून व्यक्त केला आहे.

दरम्यान सध्याच्या घडीला संसद भवन किंवा इतर गोष्टींपेक्षा माणसे वाचवणे गरजेचे आहे, असा टोला लगावत ठाकरे सरकारने सर्व आमदारांना त्यांच्या आमदार निधीपैकी एक कोटी रुपयांचा निधी कोरोनाच्या कामांसाठी वापरण्याची परवानगी दिली आहे. अशाच प्रकारचा निर्णय केंद्राने घेतल्यास लोकप्रतिनिधींना त्यांच्या मतदारसंघांमध्ये कामे करता येईल, असेही कोल्हेंनी म्हटले आहे.