कोरोना संकटात मुकेश अंबानी महाराष्ट्राच्या मदतीला, 100 मेट्रीक टन ऑक्सिजनचा करणार मोफत पुरवठा

पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ठाकरे सरकारने 1 मेपर्यंत संचारबंदीची घोषणा केली आहे. अशातच वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येत असून राज्यात ऑक्सिजन तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. दरम्यान राज्याच्या मदतीसाठी उद्योगपती मुकेश अंबानी यांनी पुढाकार घेतला आहे.

अंबानीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडकडून महाराष्ट्राला 100 मेट्रीक टन ऑक्सिजन पुरवठा केला जाणार आहे. गुजरातमधील जामनगर येथून महाराष्ट्राला हा ऑक्सिजन पुरवठा मोफत केला जाणार असल्याचे कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने सांगितले आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ट्विट करत या माहितीला दुजोरा दिला आहे

मंत्री शिंदे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, गुजरातमधील रिलायन्सच्या जामनगर प्लँटमधून महाराष्ट्रासाठी 100 मेट्रिक टन अतिरिक्त ऑक्सिजन पुरवठा होणार आहे. विभागीय आयुक्त, रायगड व ठाणे जिल्हाधिकारी आणि एफडीए आयुक्त यांची समन्वय समिती ऑक्सिजन पुरवठ्याबाबत समन्वयाचे काम करेल, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात 15 दिवसांच्या संचारबंदीची घोषणा करताना अन्य राज्यातून हवाई मार्गाने ऑक्सिजन महाराष्ट्रात आणण्यासाठी केंद्राने मदत करावी, अशी मागणी केली होती.