Coronavirus : मुंबईत ‘कोरोना’चा कहर ! महापालिकेच्या उपायुक्तांचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईत कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाची लागण झाल्याने मुंबई महापालिकेचे विशेष प्रकल्पाचे प्रभारी उपायुक्त शिरीष दीक्षित यांचे निधन झाले आहे. शिरीष दिक्षित यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर उपचार सरु होते. मात्र, मंगळवारी दीक्षित यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शिरिष दीक्षित महापालिकेच्या विशेष पाणी पुरवठा प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता होते.

कर्मचाऱ्यांना 50 लाखांच विमा संरक्षण
कोरोना व्हायरसच्या काळात कार्यरत असणाऱ्या मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना या साथीच्या काळात कार्यरत असताना मृत्यू झाला तर त्यांच्या वारसांना 50 लाख रुपये सानुग्रह अनुदान सहाय्य देण्यात येणार आहे. फक्त आरोग्य सेवेतच नाही तर पालिकेच्या सर्वच कर्यरत कर्मचाऱ्यांसाठी ही विमा योजना लागू करण्यात आली आहे. फक्त कायम नाही तर काँट्रॅक्टवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही याचा फायदा होणार आहे. नियमित कामगार, कर्मचारी यांच्यासह कंत्राटी, बाह्य स्त्रोतांद्वारे घेतलेले, मानसेवी, रोजंदारी, तदर्थ तत्त्वावरील कर्मचाऱ्यांनाही मृत्यू झाला तर सहाय्य मिळणार आहे.