Lockdown 3.0 : मुंबई महापालिकेचा महत्वाचा निर्णय ! ‘ही’ दुकानं सुरु ठेवण्यास दिली परवानगी

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – लॉकडाऊन लागू असताना देखील राज्यात कोरोना संक्रमितांची संख्या वाढतच आहे. राज्यात कोरोना संक्रमितांची संख्या १६ हजार ७५८ वर गेली असून मुंबईत १० हजारचा टप्पा पार केला असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी आदेश काढला होता की, मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येतील वाढ पाहता जीवनावश्यक वस्तू व औषधांची दुकाने सोडून इतर कोणतीही दुकाने उघडणार नाही. आता या आदेशात बदल करुन मुंबई महापालिका क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअरची दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी आयुक्तांनी दिली आहे.

परदेशी यांनी पत्राद्वारे सांगितले की, वैद्यकिय उपकरणे, वैद्यकिय सुविधांसाठी आवश्यक आयटी सिस्टीम यांच्या बिघाडानंतर त्यांची दुरुस्ती होणे आवश्यक आहे. पण इलेक्ट्रिक, हार्डवेअरची दुकाने बंद असल्यामुळे अडचणी येत आहेत. त्यामुळेच बुधवारी रात्री सुधारित आदेश काढून मुंबईतील हार्डवेअर व इलेक्ट्रॉनिक्सची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देणार आहे, असे प्रवीण परदेशी यांनी सांगितले. त्यांनी हेही स्पष्ट केले की, या आदेशात एका रस्त्यावरील एकच इलेक्ट्रॉनिक आणि हार्डवेअरचे दुकान खुले ठेवण्यास परवानगी असेल. तसेच संबंधित प्रत्येक वॉर्डमधील सहाय्यक आयुक्तांना सुचना दिल्या आहेत.

मुंबई रेड झोनमध्ये असतानाही ३ मे नंतर लॉकडाऊनमध्ये थोडी शिथिलता देत काही दुकाने आणि दारूची दुकाने खुली करण्यास परवानगी दिली होती. पण लोकांनी दारूच्या दुकानाबाहेर प्रचंड प्रमाणात गर्दी केली. तसेच सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे देखील पालन केले नाही. यामुळे प्रवीण परदेशी यांनी दारूची दुकाने आणि अनावश्यक सेवेची दुकाने बंद करण्याचे आदेश दिले होते.