…तर WhatsApp ग्रुपच्या अ‍ॅडमीनवर होणार कारवाई : मुंबई पोलिसांचा आदेश

पोलिसनामा ऑलनाईन – कोरोनाच्या प्रादुर्भावासंदर्भातील खोट्या बातम्या, अफवा आणि चुकीच्या माहितीचा प्रसार केला तर नेटिझन्स आणि सोशल मीडिया युझर्स विरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे. पोलिसांनी यासंदर्भात आदेश जारी केला आहे. अशाप्रकारच्या माहितीमुळे लोकांमध्ये भीती निर्माण होईल आणि त्यामुळे प्रादुर्भाव रोखण्यासाठी काम करणार्‍या सरकारी यंत्रणांच्या कामकाजामध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

सोशल मिडिया अ‍ॅप किंवा मेसेजिंग अ‍ॅपवर एखादी खोटी माहिती पसरवली जात असेल तर त्यासाठी त्या ग्रुपच्या अ‍ॅडमीनला जबाबदार ठरवण्यात येईल, असा स्पष्ट उल्लेख पत्रकात आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कलम 188 अंतर्गत सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी करवाई करण्यात येणार आहे. मात्र पोलिसांनी जारी केलेल्या आदेशावरुन आता राजकारण रंगण्याची चिन्ह दिसत आहे. मुंबई भाजपाचे प्रवक्ते सुरेश नाखुआ यांनी या आदेशाला ‘गँग ऑर्डर’ असे म्हटले आहे.

पोलिसांनी जारी केलेल्या आदेशामध्ये चुकीच्या बातम्यांचाप्रसार, चुकीची माहिती, चुकीची माहिती देणार मेसेजेस, व्हिडिओ फोटो किंवा मिम्स स्वरूपात आक्षेपार्ह माहितीचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, फेसबुक, टिकटॉक, इंस्टाग्राम इंटरनेट मेसेजिंग व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ऑडिओ क्लिप व इतर प्रकारे महिती पसरवली जात असल्याने सर्वसामान्यांमध्ये दहशत, संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सरकारी अधिकार्‍यांबरोबरच कोवीड 19 चा प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी केल्या जात असणार्‍या उपाययोजनांबद्दल आणि काही ठराविक समुदायांबद्दल वैर भावनेचे वातावरण आणि अविश्वास निर्माण झाला आहे.