Coronavirus : खासदार नवनीत राणा यांच्या मुलांसह कुटुंबातल्या 10 जणांना ‘कोरोना’

अमरावती : पोलिसनामा ओनलाईन – कोरोना हा असा आजार आहे जो कोणालाही होऊ शकतो. अनेक मोठ्या राजनेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आता खासदार नवनीत राणा व त्यांचे पती रवी राणा यांच्या कुटुंबातील १० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. यात त्यांची मुलेही आहेत.

राणा यांच्या मुलाची व मुलीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून रवी राणा यांचे आई-वडील नागपूरच्या व्होकहार्ट रुग्णालयात दाखल आहेत. नवनीत राणा यांचे सासरे गंगाधर राणा यांचा कोरोना अहवाल काल पॉझिटिव्ह आला. तसेच त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य आणि ५०-६० जणांची कोरोना चाचणी केली गेली. त्यात १० जण संक्रमित झाल्याचे आढळले.

आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी राणा यांच्या घराजवळील परिसर सॅनिटाइज केला जात आहे. तसेच या कुटुंबातील सदस्यांच्या संपर्कात आलेल्यांना तपासणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

चुकीच्या सॅम्पलमुळे गोंधळ
यापूर्वी नवनीत राणा आणि रवी राणा यांची कोरोना चाचणी केली गेली होती. पण त्यांचे चुकीचे थ्रोट सॅम्पल घेतल्याने गोंधळ झाला होता. मात्र रवी राणा यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे अमरावती जिल्हा प्रशासन आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणाबाबत तक्रार केली होती.

रवी राणा यांना ताप आपल्यामुळे खासगी रुग्णालयात दाखल केले गेले होते. खबरदारी म्हणून नवनीत राणा आणि रवी राणा यांचे थ्रोट स्वॅब कोविड रुग्णालयाच्या टीमने घेतले होते आणि ते तपासणीसाठी नागपूर येथे AIIMS मध्ये पाठवण्यात आले होते. मात्र AIIMS तज्ञ डॉ. मीना यांनी खासदार नवनीत राणा यांना फोन करून स्वॅब सॅम्पल चुकीचे असल्याची माहिती दिली होती.