Lockdown ला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध; CM ठाकरेंना स्पष्ट शब्दांत म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी ठाकरे सरकारकडून लॉकडाउनचा इशारा दिला जात आहे. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादीने याला स्पष्ट विरोध दर्शवला आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज्याला आणि जनतेला आता लॉकडाउन परवडणारा नसून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना इतर पर्यायांचा विचार करावा, असा सल्ला दिला आहे.

मलिक यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मलिक म्हणाले की, राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. एका दिवसात 40 हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. पण आता लॉकडाउन हे राज्याला, जनतेला परवडणार नाही. आम्ही सर्वांनी मुख्यमंत्र्यांकडे लॉकडाउन हा पर्याय नसल्याचा आग्रह धरला आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने त्यांनी प्रशासनाला लॉकडाउनची तयारी करण्यास सांगितले आहे. पण याचा अर्थ लॉकडाउन अपरिहार्य आहे असे नाही. जर लोकांनी कोरोना नियमांचे पालन केले तर लॉकडाउन टाळता येऊ शकतो, असे ते म्हणाले.

राज्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान ठाकरे सरकारपुढे आहे. मात्र यावर संपूर्ण टाळेबंदीऐवजी सार्वजनिक ठिकाणी गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी परिस्थितीनुरूप कठोर निर्बंधांवर भर देण्याचे संकेत सरकारने दिले आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांनी रविवारी कोरोना कृती दलाच्या सदस्यांबरोबर घेतलेल्या आढाव्यात तज्ज्ञ डॉक्टरांनी कोरोनाची दुसरी लाट रोखण्याकरिता कठोर उपायांवर भर दिला आहे. गर्दी कमी झाल्याशिवाय रुग्णसंख्या आटोक्यात येणार नाही, असेही निरीक्षण नोंदविण्यात आले. आता कोरोनास्थितीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारीही बैठक होणार आहे.