शरद पवारांनी गरजू ‘कोरोना’ रुग्णांसाठी दिलेली ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शन चोरीला ? साताऱ्यात खळबळ

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. कोरोना काळात कोरोनाची परिस्थिती जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याभर दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी सातारा जिल्ह्याचा दौरा केला होता. या भेटीत त्यांनी कोरोना बाधित रुग्णांवरील उपचारासाठी वापरण्यात येणारे 50 ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शन जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केली होती. गरजू आणि गरीब रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी ही भेट दिली होती.

यापूर्वी शरद पवार यांनी सातारा जिल्ह्यासाठी 125 ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शन दिली. त्यानंतर 50 अशाप्रकारे एकूण 175 इंजेक्शन देण्यात आली होती. सातारा जिल्हा सामान्य रुग्णालयाला ही सुपूर्त केली होती. मात्र, सिव्हिल हॉस्पिटलच्या कोविड वार्डातून ही इंजेक्शन चोरीला गेल्याची चर्चा सातारा शहरामध्ये सुरु आहे. ही इजेक्शन 20 ते 30 हजारांना बाहेर विक्री केली जात असल्याची चर्चा शहरात होती. यावर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ जिल्हाधिकारी यांना याबाबत निवेदन दिले आहे.

या निवेदनात म्हटलं की, आमच्या माहितीप्रमाणे 175 इंजेक्शनमधील काही इंजेक्शन चोरीला गेल्याचे समजते. त्यामुळे ही इंजेक्शन कोणाकोणाला वापरली याचा तपशील द्यावा व ती इंजेक्शने चोरीला गेली असल्यास आपण याबाबत सखोल चौकशी करुन दोषींवर त्वरीत फौजदारी गुन्हा दाखल करुन कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे सातारा जिल्हाध्यक्ष सुनिल माने यांनी केली आहे.