Lockdown : ‘लोक सुधारणार नाहीत सैनिकांना बोलवा’, या मागणीवर शरद पवारांनी दिलं ‘हे’ उत्तर

पोलीसनामा ऑनलाइन  – कोरोनामुळे देशभरात लॉकडाउन करण्यात आले आहे. असे असतानाही अनेकजण नियमांचे पालन न करता घराबाहेर भटकत आहेत. त्यामुळे कोरानाचा व्हायरस वेगाने वाढत आहे. त्यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सैन्य बोलावणे ही अगदी शेवटची वेळ आहे, पण गरजच पडली तर त्याचा विचार करता येईल असे म्हटले आहे.

शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत प्रश्नांची उत्तरे दिली. कोरोना व्हायरसमुळे 90 टक्के लोक प्रामाणिकपणे नियमांचे पालन करीत आहे. पण 10 टक्के लोक अद्यापही रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत, असेही पवार यांनी सांगितले. एका व्यक्तीने शरद पवार यांच्याकडे जनता सुधारणार नाही सैनिकांना बोलवा अशी मागणी केली.

यावर उत्तर देताना पवार यांनी आपल्याकडे एनजीओ कार्यकर्त्यांची मोठी फौज सध्या काम करत आहे. सैन्य बोलावणे ही अगदी शेवटची वेळ आहे. सैन्य हे परकियांच्या विरोधात बोलवायचे असते स्वकियांच्या नाही. त्यामुळे आवश्यकता नाही तोपर्यंत आपण सैन्याचा विचार करु नये. गरजच पडली तर त्याचा विचार करता येईल असे त्यांनी स्पष्ट केले.