Lockdown in India : देशव्यापी Lockdown बाबत केंद्र सरकारने दिले संकेत, म्हणाले… (Video)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. तसेच मृत्यूचा आकडाही वाढत असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाऊनची चर्चा सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता सरकारनेही लॉकडाऊनबाबत सूचक संकेत दिले आहेत. लॉकडाऊनसारख्या उपायांवर चर्चा सुरू असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात येत आहे.

देशातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनचा पर्याय अवलंबला जाणार का, असा प्रश्न विचारला असता नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल म्हणाले की, जर गरज भासली तर त्या पर्यायावरही चर्चा होते. 29 एप्रिलला राज्यांना सविस्तरपणे मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यात कोरोनाची चेन तोडण्यासाठी रात्रीच्या संचारबंदीसह सर्वप्रकारच्या निर्बंधांबाबत सांगितले आहे. दरम्यान, देशभरात मंगळवारी (दि. 4) कोरोनामुळे तब्बल 3 हजार 780 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबळींची संख्या 2 लाख 26 हजार 188 वर पोहचली आहे. तर काल देशात 3 लाख 82 हजार 315 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील रुग्णांची संख्या 2 कोटी 6 लाख 65 हजार 148 वर पोहोचली आहे. सध्या देशातील सक्रीय रुग्णांची संख्या 34 लाख 87 हजार 229 वर पोहोचली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार देशातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ही 1 कोटी 69 लाख 51 हजार 731 एवढी झाली आहे. तर देशातील मृत्युदर घटून 1.09 टक्के झाला आहे.