हाताला ‘मुंग्या’ आणि ‘वेदना’ होत असतील तर तुम्हाला होऊ शकतो ‘कोरोना’, नव्या लक्षणानं केलं आश्चर्यचकित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग संपूर्ण जगासाठी एक चिंतेचा विषय झाला आहे. अमेरिका, इटली आणि ब्रिटनसारख्या अन्य देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाची प्रकरणे कमी आहेत आणि कोरोनाने होणार्‍या मृत्यूंचा आकडाही कमी आहे. मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये चीनच्या वुहानमधून जेव्हा ही महामारी पसरण्यास सुरूवात झाली, तेव्हा जागतिक आरोग्य संघटनेने ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास ही कोरोनाची प्रमुख लक्षणे असल्याचे ठरवले होते. परंतु, काही कालावधीनंतर हा संसर्ग वाढत गेला आणि त्याची नवी लक्षणेसुद्धा समोर येत गेली. नुकतेच कोरोनाच्या संसर्गाचे आश्चर्यचकित करणारे नवे लक्षण समोर आले आहे. ज्यास पॅराथीसिया म्हटले जाते.

ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास, घशात खवखव, मांसपेशींमध्ये वेदना इत्यादी कोरोनाची सामान्य लक्षणे आहेत. तर काही आठवड्यापूर्वी चव आणि वास न येणे हे लक्षणसुद्धा यामध्ये सामिल करण्यात आले. याशिवाय काही रूग्णांमध्ये मानसिक परिणाम सुद्धा दिसून आले. यामध्ये शुद्ध हरपण्यासारखे प्रकार समोर आले आहेत. ब्रिटनच्या एक्सप्रेस डॉट को डॉट यूकेच्या अहवालानुसार, हातामध्ये वेदनांसह मुंग्या येणे, हे सुद्धा कोरोनाचे सुरूवातीचे लक्षण असल्याचे सांगितले जात आहे.

अहवालानुसार, इंग्लंडमध्ये कोरोनाच्या रूग्णांच्या हाताला मुंग्या येण्यासह जास्त वेदाना होण्याचे प्रकार दिसून आले आहेत. काही रूग्णांच्या सांगण्यानुसार त्यांना वीजेच्या झटक्याप्रमाणे वाटले आणि नंतर संपूर्ण शरीरात मुंग्या आल्यासारखे वाटू लागले. एका रूग्णाने सांगितले की, हाताला मुंग्या येणे, हेच त्याच्यात कोरोनाचे पहिल्यापासूनचे लक्षण होते. या नव्या लक्षणाचे नाव पॅराथीसिया आहे, आणि यामध्ये सुई किंवा पिन टोचल्यासारख्या वेदना होतात.

न्यूयॉर्कमध्ये माऊंट सिनाई डाऊन टाऊनचे संसर्ग नियंत्रण आणि प्रतिबंध संचालक डॉ. वलीद जावेद यांच्यानुसार, व्हायरसच्या संसर्गाविरोधात इम्यून सिस्टमच्या प्रतिक्रियेमुळे हे लक्षण जाणवते. ही शरीराच्या रोग प्रतिकारकशक्तीचीच प्रतिक्रिया आहे, जी यावेळी कोरोना रूग्णांसोबत घडत आहे.

व्हायरसने शरीरात प्रवेश करताच आपल्या प्रतिकारक पेशी सक्रिय होतात. यामुळे शरीरात अनेक प्रकारच केमिकल्स तयार होतात, ज्यामुळे मुंग्या आल्यासारखे वाटते. डॉ. जावेन यांच्यानुसार, अन्य आजारातही असे अनुभव त्यांनी ऐकले आहेत.

कोरोना रूग्णांना सुद्धा सुई किंवा पिन टोचल्यासारख्या वेदनांचा अनुभव आला आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, डायबिटीज आणि ऑटोइम्यून कंडिशनवाल्या लोकांना अशा वेदना जाणवण्याची शक्यता असते. सध्या या लक्षणाच्यामागील निश्चित कारण सांगणे अवघड आहे. परंतु, तज्ज्ञांचे मत आहे की, नेहमी अनियमित ब्लड सर्क्युलेशन किंवा तंत्रिकांवरील दबावामुळे असे होते.

हातात वेदना आणि मुंग्या येण्यामागे अन्य कारणे सुद्धा असू शकतात. यामुळे आरोग्य तज्ज्ञांनी म्हटले आहे की, हाताला वेदना आणि मुंग्या आल्यास तुम्हाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे, असे समजू नका. सुका खोकला, घशात खवखव आणि ताप ही लक्षणे सुद्धा असतील तर तुम्ही असा विचार करू शकता.