ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे 12 कोरोना रुग्णांचा तडफडून मृत्यू, वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ

भोपाळ: पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे. सोमवारी (दि. 19) देशात जवळपास पावणे तीन लाख रुग्णांची नोंद झाली. रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे ऑक्सिजन, रेमडेसिविरचा तुटवडा निर्माण झाला आहे. असे असतानाच मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भोपाळच्या पीपल्स रुग्णालयात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे 12 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. मात्र या वृत्ताचे रुग्णालय प्रशासनाने खंडन केले आहे. ऑक्सिजन पुरवठा काही वेळासाठी खंडित झाला होता. मात्र त्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाला नाही. प्रकृती खालावल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याचे स्पष्टीकरण रुग्णालयाने दिले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पीपल्स रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता असल्याची तक्रार रुग्णांचे नातेवाईक करत होते. रुग्णालयातील कर्मचारी या गोष्टीची माहिती देऊन रुग्णांना दाखल करून घेत होते. ऑक्सिजन प्रमाण पुरेसे नसल्याने रात्री उशिरा किंवा सकाळी ऑक्सिजन संपून जातो. सोमवारी सकाळच्या सुमारास ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाल्याने 10 ते 12 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. रुग्णालयाने हे वृत्त फेटाळले आहे. ऑक्सिजन पुरवठा कमी-जास्त होत असतो. मात्र रुग्णांच्या मृत्यूला ऑक्सिजनचा तुटवडा जबाबदार नाही. प्रकृती खालावल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्टीकरण रुग्णालयाने दिले आहे.