आरोग्य मंत्रालयाचा केंद्राला प्रस्ताव, म्हणाले – ‘देशातील 150 जिल्ह्यात Lockdown गरजेचा’ ! महाराष्ट्रातील किती?

नवी दिल्ली: पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे. गेल्या 6 दिवसांपासून देशात दररोज 3 लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रव्यापी लॉकडाऊन लागू होणार का याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र देशव्यापी लॉकडाऊन लागण्याची शक्यता कमी असून जिल्हास्तरावर लॉकडाऊनची तयारी केंद्राने सुरु केली आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊन लागू केल्याने त्याचा थेट फटका अर्थव्यवस्थेला बसला.त्यामुळे आता जिल्हास्तरावर लॉकडाऊनचा विचार केंद्र सरकार करत आहे. त्यानुसार आरोग्य मंत्रालयाने एक प्रस्ताव तयार केला आहे. कोरोना संक्रमणाचा दर 15 टक्के असलेल्या 150 जिल्ह्यांत लॉकडाऊनची शिफारस मंत्रालयाने केली आहे. काही आठवड्यांचा लॉकडाऊन केल्यास कोरोनाची साखळी तोडता येईल, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

देशात कोरोना संक्रमणाचा दर 15 टक्के असलेल्या जिल्ह्यांची संख्या 150 असण्याची शक्यता आहे. आरोग्य मंत्रालयाच्या काल झालेल्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा झाली. केंद्र सरकार राज्य सरकारांशी चर्चा करून याचा अंतिम निर्णय घेईल. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लवकरच या संदर्भात महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यातच विदर्भ, मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यातील परिस्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे या भागातील अनेक जिल्ह्यांचा समावेश आरोग्य मंत्रालयाच्या प्रस्तावात असू शकतो. आरोग्य मंत्रालयाकडून केंद्राला दिलेल्या प्रस्तावात कोरोना पॉझिटिव्हिटीचा दर 15 टक्क्यांहून अधिक असलेल्या जिल्ह्यांत लॉकडाऊन गरजेचा असल्याचे यात नमूद केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळून या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लावावा लागेल, अन्यथा येथील आरोग्य सुविधांवर ताण येईल, असा सतर्कतेचा इशारा दिला आहे.