बेडच्या शोधात रुग्णासह ऑक्सिजन सिलिंडर घेऊन नातेवाईकांची 3 दिवस पायपीट

अहमदाबाद : वृत्तसंस्था – देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे. वेळेवर उपचार मिळत नसल्याने अनेकांचा मृत्यू होत आहे. अशातच गुजरातच्या अहमदाबादमध्ये एका कोरोना रुग्णाला 3 दिवस ऑक्सिजन बेड मिळाला नाही. त्यामुळे 3 दिवस त्याचे नातेवाईक त्याच्यासोबत ऑक्सिजन सिलिंडर घेऊन बेडच्या शोधात फिरत होते. सुदैवाने त्या रुग्णास अखेरीस बेड मिळाला.

राजकोटपासून 27 किलोमीटरवरील लोधिडा गावात राहणाऱ्या हरेश परमार (वय 50) यांना सहा दिवसांपूर्वी कोरोनाची लक्षण जाणवू लागली. त्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांना नीट चालताही येत नव्हते. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण 80 टक्क्यांच्या खाली गेले होते. त्यांच्यासोबत असलेल्या तीन नातेवाईकांपैकी एकाने ऑक्सिजन सिलिंडर धरला होता. दुसऱ्याने ड्रिप बॉटल पकडली होती. तर तिसऱ्याच्या हातात युरिन बॅग होती. आम्ही 3 दिवसांपासून याच परिस्थितीत असल्याची माहिती हरेश यांचा पुतण्या अक्षयराजने दिली आहे. अक्षयराज म्हणाला की, आम्ही त्यांना सर्वच खासगी आणि सरकारी रुग्णालयांत घेऊन गेलो. मात्र कुठेही आम्हाला ऑक्सिजन बेड मिळाला नाही. एक नातेवाईकांकडून येथील सिव्हिल रुग्णालयात काही दिवसांपूर्वीच बेड वाढवल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर आम्ही वेळ न दवडता लगेचच रुग्णालय गाठले. 2 ऑक्सिजन सिलिंडर घेऊन आम्ही रुग्णालयात पोहोचलो. अनेक तास प्रतिक्षा केल्यानंतर अखेरीस बेड मिळाल्याचे त्याने सांगितले.