‘कोरोना’वर BCG ची लस परिणामकारक, श्वसनाची अडचण दूर होते

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कोविडच्या रुग्णाला (COVID-19 positive patient) श्वसनाला अडचण येत असेल तर त्यावर बीसीजी (BCG) लसीचा वापर करता येऊ शकेल असे एका संशोधनातून समोर आले आहे. परेलच्या हाफकिन रिसर्च इन्स्टिट्यूट आणि पुण्याच्या बी. जे. मेडिकल महाविद्यालयातील संशोधकांच्या गटाने यासंदर्भात संशोधन केले. त्यात क्षयरोगावर वापरण्यात येणा-या बीसीजी लसीचा डोस कोरोनाच्या रुग्णाला दिला असता त्याची श्वसनाची (bcg-vaccine-effective-corona-useful-respiratory-distress) अडचण दूर होते, असे संशोधनातून समोर आले आहे.

बीसीजीची ही लस अनेक दशकांपासून क्षयरोग प्रतिबंधक म्हणून लहान मुलांना दिली जाते. या लसीचा कोरोनाच्या रुग्णांवर काही परिणाम होतो का, हे तपासण्यासाठी या दोन संस्थांच्या संयुक्त संशोधन गटाने अभ्यास केला. या संशोधनासाठी 60 अशा कोरोना रुग्णांना बीसीजी लस दिली. ज्यांना न्यूमोनिया आणि श्वसनाचा त्रास होत होता. त्यापैकी अर्ध्या रुग्णांची श्वसनाची समस्या तीन ते चार दिवसांत कमी झाली. या रुग्णांपैकी कुणाच्याही मृत्यूची नोंद झाली नाही. परंतु ज्यांना या लसीचा डोस दिला नाही अशा दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. या संशोधनाची अजून इतर तज्ज्ञांकडून खातरजमा व्हायची आहे, पण ज्यांना बीसीजीची ही लस दिली आहे. त्यांच्या शरीरात प्रतिकारक शक्तीची वाढ झाल्याचे मत संशोधकांनी नोंदवले.

रोगप्रतिकारशक्तीत वाढ
कोरोना रुग्णाला बीसीजी लस देणे हे अत्यंत सुरक्षित आहे. कोरोना रुग्णाला देण्यात येणाऱ्या स्टँडर्ड औषधांच्या सोबत याचा वापर केल्यास फायदा होईल. रुग्णाला आधी श्वसनाचा त्रास होत होता त्याचा त्रास तीन ते चार दिवसांत कमी झाला आणि न्युमोनियाही गतीने बरा झाला. सोबत रोगप्रतिकारशक्तीमध्ये वाढ झाल्याचेही दिसून आले, असे हाफकिन रिसर्च इन्स्टिट्यूटच्या डॉ. उषा पद्मनाभन यांनी सांगितले. ज्या रुग्णांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण 94 टक्क्यांपेक्षा कमी झाले होते आणि त्यांना न्यूमोनियाचा त्रास सुरू झाला अशाच रुग्णांवर बीसीजी लसीचा वापर करण्यात आला होता.