ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. मागील काही दिवसांपासून उच्चांकी रुग्ण आढळून येत आहेत. त्यातच अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्याने रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. वाढत्या कोरोना संक्रमणामुळे पोलिसांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण झालेले अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाचे राज्यातील ते पहिलेच अधिकारी आहेत. आपण लवकरच कोरोनावर मात करु असा विश्वास फणसळकर यांनी व्यक्त केला आहे.

ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची रविवारी कोरोनाची तपासणी पॉझिटिव्ह आली आहे. ठाण्यात आतापर्यंत 129 अधिकाऱ्यांसह 1 हजार 305 पोलीस बाधित झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून फणसळकर यांना खोकला आणि ताप येत होता. त्यामुळे त्यांनी रविवारी कोरोनाची तपासणी केली. या तपासणीमध्ये ते पॉझिटिव्ह आढळल्यामुळे ते मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांचे ऑक्सिजनचे प्रमाण चांगले असून प्रकृतीही स्थिर असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

पोलीस आणि नागरिकांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, यासाठी फणसळकर हे कार्यालयात तसेच ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर या सर्वच परिमंडळातील पोलीस ठाण्यांच्या कर्यक्षेत्रामध्ये भेटी देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेत होते. पोलिसांमध्ये वाढते कोरोनाचे प्रमाण लक्षात घेता त्यांनी सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये काही सामाजिक संस्थांच्या मदतीने कोरोना तपासणी आणि उपचाराची मोहीम राबवली होती.

यापूर्वी पोलीस आयुक्तांचे रिडर अजय घोसाळकर, कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यापाठोपाठ ठाण्याच्या पोलीस आयुक्तांनाही लागण झाल्यामुळे आयुक्तालयात चिंतेचे वातावरण आहे.