‘घरात बसून मुंबईचं चित्र भयावह नाहीच वाटणार, जरा बाहेर फिरा !’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचे संकट वाढत आहे. मुंबईत वाढणारा रुग्णांचा आकडा, स्थलांतरित मजुरांच्या घरवापसीचा मुद्दा, केंद्राने दिलेल्या पॅकेजचा विषय, यावरून मागील काही दिवसांपासून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक सुरु आहे. देवेंद्र फडणवीस विरुद्ध जयंत पाटील, आशिष शेलार विरुद्ध सचिन सावंत अधून मधून संजय राऊत यांची फटकेबाजीने सामना रंगत आहे. यातच भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

कोरोनाविषयी मुंबई परिसरातील जे भयावह चित्र उभं केलं जात आहे ते अनाठायी असून आम्ही प्रयत्नपूर्वक कोरोना विषाणूला नियंत्रणात नक्की आणू, असा दावा मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी संपादकांशी संवाद साधताना केला होता. महानगर परिसरात 31 मे पर्यंत दीड लाख लोकांना कोरोना होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु प्रत्यक्षात आजचे आकडे तुलनेने खूप कमी आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलं होतं. या संदर्भात एका वृत्तपत्राच्या बातमी ट्विट करत आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

घरात बसून मुंबईचे चित्र भयावह नाही असे वाटणे स्वाभाविक आहे. जरा बाहेर फिरा, किमान लोकांचे फोन तरी उचला म्हणजे समजेल बाहेर काय स्थिती आहे ते. ICMR ने मुंबईबाबत कोणतीही आकडेवारी दिली नसताना त्या आधारावर खोटारडे विधान करणे हे निबरपणाचे लक्षण आहे मुख्यमंत्री महोदय, असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे.