Coronavirus in Gujrat : 3 दिवसांपासून रूग्णालयात मृतदेहांचा खच, हेच का गुजरात मॉडेल?

वलसाड : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्र, दिल्ली यांच्या पाठोपाठ गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मध्य प्रदेशमध्येही वाढला आहे. दरम्यान, गुजरातमधल्या वलसाडमधील सिव्हिल रुग्णालयात मृतदेहांचा खच पडला आहे. गेल्या तीन दिवसांपासून १५ हून अधिक मृतदेह रुग्णालयात पडून आहेत. कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्यानं वाढत असल्यानं आता आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडला आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्था कोसळण्याच्या स्थितीत आहे.

वलसाड गुजरातमधील सीमावर्ती जिल्हा आहे. वलसाडची सीमा महाराष्ट्राला लागून आहे. जवळच्या डांग आणि नवसारी जिल्ह्यांमधले रुग्णदेखील उपचारांसाठी वलसाडमध्ये येतात. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी प्रोटोकॉल पाळण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्याचं जिल्हाधिकारी आर. आर. रावल यांनी सांगितलं. हेल्प डेस्क तयार करून रुग्णांचे मृतदेह तातडीनं त्यांच्या कुटुबांकडे सुपूर्द करा, असे आदेश रुग्णालय प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. रुग्णालयातून मृतदेह मिळण्यास १२ तासांचा विलंब होत असल्याची तक्रार अनेक कुटुंबीयांनी केली.

दरम्यान, वलसाडमधील रुग्णालयात कोरोना रुग्णांचे मृतदेह पारदर्शक बॅग्समध्ये ठेवण्यात आले आहेत. हे मृतदेह अद्याप कुटुंबीय किंवा नातेवाईकांकडे सोपवण्यात आलेले नाहीत. गेल्या ३ दिवसांपासून मृतदेह आयसोलेशन वॉर्डमध्येच असल्यानं आता त्यामधून दुर्गंधी येऊ लागली आहे. वलसाडमधील रुग्णालयात ३०० खाटा आहेत. सध्याची परिस्थिती पाहता १०० खाटा वाढवण्यात आल्या आहेत. या सगळ्या खाटा सध्या भरल्या आहेत. याशिवाय जिल्हा प्रशासन आणखी सोयी सुविधा उपलब्ध करण्याच्या प्रयत्नात आहे.