Congress Leader : ‘कोरोनासाठी काही प्रमाणात आम्ही राजकीय नेतेही दोषी’

नवी दिल्ली, ता. १७ : पोलीसनामा ऑनलाइन : पुन्हा एकदा देशात कोरोनाने शिरकाव केला आहे. अनेक राज्यांमध्ये कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम आयसोलेशन, क्वारंटाईन असे अनेक उपाय कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केले जात आहेत. मात्र तरी देखील दुसरीकडे कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर, काँग्रेसच्या एका नेत्याने “कोरोनासाठी काही प्रमाणात आम्ही राजकीय नेतेही दोषी असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. हे ट्विट करताना गेहलोत यांनी सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या विधानाचा हवाला दिला आहे. “सोनिया गांधी बरोबर म्हणतात, की कोरोना संक्रमणाच्या प्रसारासाठी आम्ही राजकीय नेतेही काही प्रमाणात दोषी आहोत. आता कोरोना नव्या रुपात प्रकट झाला आहे आणि देशात भयावह स्थिती निर्माण होत चालली आहे. इतकंच नाही, तर कर्फ्यू आणि लॉकडाऊनसारखे निर्णय घ्यावे लागत आहेत. पंतप्रधानांनी पूर्वीप्रमाणेच राज्यांसोबत चर्चा करायला हवी”

 

 

 

 

याच दरम्यान देशातील कोरोना परिस्थितीवरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून मोदी सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. “राजकारणाचा डोस कमी करून केंद्राने कोरोना युद्धावर लक्ष ठेवले असते तर परिस्थिती नक्कीच नियंत्रणात असती” असं म्हणत हल्लाबोल करण्यात आला आहे. तसेच कोरोनाच्या संकटाने धोक्याची पातळी कधीच ओलांडली आहे. दिल्लीसह देश तडफडताना दिसत आहे. चित्र भयंकर होतेच, ते अधिक धोकादायक होताना दिसत आहे असं म्हटलं आहे.

आज कोरोनाचे जे दुसरे तुफान उठले आहे त्यास सर्वस्वी जबाबदार चीन नसून निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारच आहे. एकाच वेळी सामुदायिक चिता भडकावून कोरोनाग्रस्त शवांची विल्हेवाट लावली जात असताना मायबाप केंद्र सरकार प. बंगालात निवडणूक खेळात दंग आहे” असं म्हणत भाजपावर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. “राहुल गांधी यांचा अभ्यास व अक्कल दिल्लीतील विद्यमान राज्यकर्त्यांपेक्षा उच्च कोटीची आहे व राहुल गांधी हे कोरोनालढाईत सरकारपेक्षा शंभर पावले पुढे आहेत. केंद्र सरकारने या संकटसमयी तरी अहंकार व राजकीय लाभ-तोटय़ाचे गणित बाजूला ठेवून सगळय़ांशी खुल्या दिलाने चर्चा केल्या पाहिजेत” असं देखील सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

देशात कोरोना लसीकरण देखील वेगाने होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय करण्यात येत आहेत. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. शनिवारी (१७ एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे २,३४,६९२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या एक कोटी ४५ लाखांवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा १,७५,६४९ वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी १६,७९,७४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर १,२६,७१,२२० रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या १,४५,२६,६०९ वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात १,७५,६४९ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.