धक्कादायक ! वॉर्ड बॉयने ऑक्सिजन सपोर्ट काढल्याने कोरोना रुग्णाचा तडफडून मृत्यू, घटना CCTV त कैद

शिवपुरी : पोलीसनामा ऑनलाइन – देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. अनेक राज्यात ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. तर कुठे रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाहीत. अशातच मध्य प्रदेशातल्या शिवपुरी जिल्हा रुग्णालयातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वॉर्डबॉयने ऑक्सिजन सपोर्ट काढल्याने रुग्णाचा तडफडून मृत्यू झाला आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणात रुग्णालयाचे डॉक्टर अक्षय निगम यांनी सारवासारव केली आहे. रुग्णाच्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण 6 ग्रॅमवर आले होते. त्यांना ऑक्सिजनची गरज नव्हती. त्यामुळे नर्सच्या सांगण्यावरून वॉर्ड बॉयने रुग्णाचा ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर काढून तो दुसऱ्या रुग्णाला दिल्याचे निगम यांनी म्हटले आहे. सद्या या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती नेमली आहे.

सुरेंद्र असे मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव आहे. शिवपुरी जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनअभावी सुरेंद्रचा अक्षरश: तडफडून मृत्यू झाला. मात्र रुग्णाची अवस्था गंभीर असल्याने उपचारादरम्यान त्याचे निधन झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे. मात्र सीसीटीव्ही फुटेजमधून वेगळच चित्र समोर आले आहे. सुरेंद्र रात्री 11 वाजता त्यांचा मुलगा दीपकसोबत बोलताना दिसत आहे. थोड्या वेळाने दिपक निघून गेल्यानंतर सुरेंद्र झोपी गेले. त्यानंतर तिथे एक वॉर्ड बॉय येऊन सुरेंद्रच्या बेडजवळील पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर काढून नेला. त्यानंतर पहाटे पाचच्या सुमारास सुरेंद्रचा ऑक्सिजनअभावी तडफडून मृत्यू झाला. माझ्या वडिलांना ऑक्सिजन न दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप मुलाने केला आहे. यापूर्वी माझ्या वडिलांना स्ट्रेचरदेखील मिळाला नव्हता. मी त्यांना पाठीवरून आयसीयूमध्ये घेऊन गेलो होतो, अशी व्यथा दिपकने मांडली आहे.