खळबळजनक ! दिल्लीतील रुग्णालयातील 80 डॉक्टर कोरोनाबाधित; एकाचा मृत्यू

नवी दिल्ली : कोरोनामुळे देशाची अवस्था बिकट झाली आहे. दिल्लीचीही परिस्थिती गंभीर बनली आहे. दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढत चालली आहे. रुग्णांना बेडसाठी धावपळ करावी लागत आहेत. दरम्यान एक धक्कदायक माहिती समोर आली असून दिल्लीतील सरोज रुग्णालयात सुमारे ८० डॉक्टर कोरोनाबाधित आढळून आले आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून रुग्णालयाचे वरिष्ठ शल्य चिकित्सक डॉ. ए के रावत यांचा मृत्यू झाला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता सर्व ओपीडी सेवा बंद करण्यात आल्या आहेत. तर बाधित आढळलेल्या ८० पैकी १२ जण रूग्णालयात दाखल आहेत. तर इतर सर्व डॉक्टर्संना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

राजधानीत कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने बेड, ऑक्सिजन आणि वेळेत उपचार मिळेनासे झाले आहे. अनेक नागरिकांना प्राण गमावावे लागत आहे.त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता दिल्लीचा लॉकडाऊन पुन्हा एक आठवडा वाढविण्यात आले आहे. १७ मे पर्यंत हा लॉकडाऊन असणार असून यामध्ये निर्बंध आणखी कडक करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसात १३ हजराहून अधिक नवे कोरोनाबाधित आढळले असून २७३ जणांचा मृत्यू झाला. सध्या ८६ हजार सक्रिय रुग्ण आहेत.

दिल्लीत लॉकडाऊन वाढविला; कडक निर्बंधासह आजपासून मेट्रो सेवाही बंद दिल्लीतील लॉकडाऊन १० मेला संपणार होता मात्र रविवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत हा लॉकडाऊन आणखी एक आठवडा वाढवल्याची घोषणा केली. या आठवडाभराच्या लॉकडाऊनमध्ये मेट्रो सेवाही बंद करण्यात येणार आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे. केजरीवाल म्हणाले, गेल्या काही दिवसांत कोरोना संक्रमणाचा दर ३० टक्क्यांवरून २३ टक्क्यांवर आला आहे. लॉकडाऊनचा परिणाम चांगला दिसून येत आहे. २६ एप्रिलनंतर कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत घट होत असल्याचेही अरविंद केजरीवाल म्हणाले.