Coronavirus : राजधानी दिल्ली ‘कोरोना’चा हाहाकार, 24 तासात 7745 नवे पॉझिटीव्ह तर 77 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – राजधानी दिल्लीत कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. त्यात आता वाढती थंडी आणि सणासुदीच्या काळात कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात कोरोना रुग्णांचा नवीन रेकॉर्ड झाला आहे. गेल्या 24 तासांमध्ये दिल्लीत 7,745 नवे कोरोनाचे रुग्ण (COVID19 cases) आढळून आले आहेत. ही रुग्णसंख्या एका दिवसातील आतापर्यंतची सर्वांत मोठी असल्याचे समोर आले आहे.

दिल्लीच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून दररोज सहा हजारांहून अधिक नवीन कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. मात्र, रविवारी (दि.8 ) दिल्लीत गेल्या 24 तासांत कोरोना रुग्णांची विक्रमी नोंद झाली आहे. रविवारी कोरोनाचे 7747 नवीन रुग्ण आढळले. तर 77 रुग्णांचा मृत्यू (death) झाला. तसेच, गेल्या 24 तासांमध्ये 6, 069 रुग्ण बरे होऊन घरी (discharges/migrations) परतले आहेत.

दिल्लीत कोरोना संक्रमणाचा दर म्हणजेच पॉझिटिव्हिटी रेट15 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. अशाप्रकारे सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या जवळपास 42 हजारांवर पोहोचली आहे. आतापर्यंतची ही सर्वांत मोठी आहे. दिल्लीत सध्या एकूण 41,857 सक्रीय रुग्ण (Active cases)आहेत. तसेच, येथील रिकव्हरी रेट 88.54 टक्के आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या 9.54 टक्क्यांवर पोहचली आहे. मृत्यूदर 1.59 टक्के असून गेल्या 24 तासांत पॉझिटिव्ह रेट वाढून 15.26 टक्क्यांवर पोहचला आहे. गेल्या 24 तासांत राजधानी दिल्लीत 7745 रुग्ण आढळल्यामुळे एकूण संख्या 4,38,529 पर्यंत पोहचली आहे.

यादरम्यान, 6 069 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 3,89, 683 रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 77 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत एकूण 6, 698 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत दिल्लीत 50, 745 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. आतापर्यंत एकूण 50,99,774 कोरोनाचा चाचण्या केल्या आहेत. दरम्यान, याआधी शनिवारी दिल्लीत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 6, 953 नवीन रुग्ण आढळले होते.