COVID-19 : कांदिवली, बोरिवली व दहिसरमध्ये राबणार ‘हा’ पॅटर्न

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्व भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात पालिका प्रशासनाला यश आले आहे. आता उत्तर मुंबईतील परिमंडळ 7 च्या अख्यारितीत येत असलेल्या कांदिवली, बोरिवली व दहिसरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धारावी पॅटर्न राबवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

कोरोनाच्या रुग्णांचा लवकरात लवकर शोध घेण्यासाठी या भागात नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेऊन सारो टेस्ट करण्यात येत असल्याची माहिती परिमंडळ 7 चे उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी दिली. या परिमंडळात आर दक्षिण, आर मध्य व आर उत्तर हे तीन वॉर्ड येतात. येथील सहाय्यक आयुक्त, आरोग्य अधिकारी व संबंधित कर्मचारी यांनी येथील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी कंबर कसली आहे.

धारावी पॅटर्नच्या धरतीवर या भागातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. तसेच मोबाईल स्क्रिनिंग करणे, लक्षणे आढळून आल्यास कोरोनाची चाचणी करणे, कंटेनमेंट झोनमध्ये पोलिसांच्या मदतीने प्रभावीपणे लॉकडाऊन करणे, क्वारंटाईन सेंटरची उभारणी करण्यात येणार आहे. एखाद्या इमारतीमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळून आला तर इमारत सील करण्याची कामे युद्ध पातळीवर करण्यात येत आहेत.

पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या आदेशानुसार चेस द व्हायरस व मिशन झोरो मोहिम या परिमंडळात प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. या परिमंडळात आर दक्षिण मध्ये 25, आर मध्य 13 आणि आर उत्तर मध्ये 93 असे एकूण 131 फिव्हर शिबीरं घेण्यात आली आहेत तर परिमंडळात 155 ज्येष्ठ नागरिकांना ऑक्सिजनची गरज भासल्याने त्यांना दवाखान्यात अॅडमिट करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

रविवारी (दि.28) आर दक्षिण मध्ये 64, आर मध्य मध्ये 74 आणि आर उत्तर सह इतर तीन वॉर्डमध्ये 184 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. तर आतापर्यंत आर दक्षिण मध्ये 2440, आर मध्य मध्ये 2371 व आर वॉर्डमध्ये 1491 कोरोना बाधित रुग्ण असे एकूण 6302 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते. तर या तीन वॉर्डमध्ये आतापर्यंत 2943 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, सध्या या वॉर्डमध्ये 3003 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून 1162 इमारती सील केल्या आहेत.