दिलासादायक ! कोरोना रुग्णांसाठी DRDO ची प्रणाली ठरु शकते ऑक्सिजनचा पर्याय

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमरता भासत आहे. त्यामुळे संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (DRDO) कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता पूरक ऑक्सिजन वितरण प्रणाली तयार केली आहे. याचा वापर उंच भागात तैनात असलेल्या जवानांसाठी केला जाऊ शकतो असे सांगितले जात आहे. तसेच कोरोना रूग्णांसाठी देखील हे खूप उपयुक्त ठरणार आहे. गंभीर रूग्णांसाठी ऑक्सिजन खूप महत्वाचा आहे. अशा परिस्थितीत डीआरडीओची ही प्रणाली कोणतेही सामान्य व्यक्ती हाताळू शकतात. तसेच, SpO2 च्या निगरानीसाठी डॉक्टर आणि पॅरामेडिकलचे काम व वेळ कमी लागणार आहे.

संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या या संकट काळात डीआरडीओची ही स्वयंचलित यंत्रणा वरदान ठरू शकते. बंगळुरूच्या डीआरडीओच्या डिफेन्स बायो-इंजीनिअरिंग अँड इलेक्ट्रो मेडिकल लॅबोरेटरीद्वारे ही प्रणाली विकसित केली आहे. ही प्रणाली SpO2 एक लेव्हल सेट केल्यानंतर व्यक्तीला हायपोक्सियाच्या स्थितीत जाण्यापासून वाचवते. जी बहुतेक प्रकरणांमध्ये धोकादायक आहे. हायपोक्सिया ही अशी स्थिती आहे, ज्यात टिश्युपर्यंत पोहोचण्याचे ऑक्सिजनचे प्रमाण शरीराच्या सर्व ऊर्जेची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी अपुरी असते.

कोरोना झालेल्या रूग्णामध्येही हेच दिसून येत आहे. त्यामुळे हे संकट सध्या अधिक तीव्र होत आहे. दरम्यान देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्याचा महत्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तसेच केंद्राने लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी खासगी रुग्णालय आणि औद्योगिक संस्थांना थेट लस कंपन्यांकडून साठा खरेदी करण्याची परवानगी दिली आहे. पुढील महिन्यापासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होत आहे.