Coronavirus : कोरोनाबधिताच्या संपर्कात आल्यानंतर किती वेळात होतो संसर्ग?, जाणून घ्या तज्ञांचे मत

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाचे संकट गडद होत आहे. कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत असून बाधितांच्या संख्या वाढत आहे. मृत्यूचेही प्रमाण वाढले आहे. दिल्लीत गेल्या २४तासात १७ हजार २८२ नवे कोरोनाबाधित आढळले असून बाधितांचे प्रमाण १५.९२ आहे. तर मृतांची संख्या १०४ इतकी आहे. कोरोनाची दुसरी लाट पहिल्यापेक्षा अधिक भीषण असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी कोरोनाबाधितच्या संपर्कात आलेल्या ३० ते४० टक्के लोकांनाच संसर्ग व्हायचा आता हेच प्रमाण ७० ते८० टक्क्यांवर गेले आहे. जर मास्क न घालता बाधितांच्या संपर्कात आल्यास अवघ्या मिनिटात तोही बाधित होत असल्याचे समोर आले आहे.

गेल्या काही दिवसापासून देशातील बाधितांची संख्या वाढण्यामागे हे एक महत्त्वाचे कारण आहे. यापूर्वी जर बाधितांच्या संपर्कात कोणी आलं तर १० मिनिटांनी संसर्ग होण्याचा धोका असायचा आता मात्र ही वेळ मिनिटांवर आली आहे.

बीएलके सुपरस्पेशॅलिटी रुग्णालयाचे श्वसनतज्ज्ञ डॉ. संजीव नय्यर यांनी सांगितल्यानुसार कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. आधीच्या तुलनेत आताचा याचा वेग खूप जास्त आहे. पूर्वी संसर्गाचा वेळ १० मिनिटांचा होता तो आता मिनिटांवर आला आहे. दिल्लीत ३० ते ४० वयोगटातील लोक जास्त प्रमाणात कामासाठी बाहेर पडत आहेत त्यामुळे या वयोगटात कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आहेत. बाधितांच्या संख्येत या वयोगटातील रुग्णांचे प्रमाण लक्षणीय आहे.