देशातील ऑक्सिजनचा साठा गेला कुठे? मोदी सरकारच्या निर्णयावरून माहिती समोर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाने हाहाकार केला असून, दैनंदिन कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. काही दिवसापूर्वी रुग्णाचा आकडा पाहता एक लाखाच्या वर होता. सध्या तो आकडा २ लाख पार झाला आहे. ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा होत असल्याने रुग्णांची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांना आरोग्याच्या सुविधा व्यवस्थित उपलब्ध होताना दिसत नसल्याचं समोर आलं आहे.

अशा परिस्थितीत भारतात ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली असतानाच मोदी सरकारने घेतलेला एक निर्णय पुढं आला आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या एप्रिल महिना ते जानेवारी या काळात भारतातून तब्बल ९ हजार २९४ मेट्रिक टन ऑक्सिजन निर्यात केला गेली आहे. असे वृत्त मनीकंट्रोल या वृत्त संकेतस्थळाकडून देण्यात आलं आहे. तर मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत हा आकडा दुपटीहून जास्त आहे. मागील वर्षी याच काळात ४ हजार ५०२ मेट्रिक टन ऑक्सिजन देशाबाहेर निर्यात करण्यात आली आहे. तसेच, निर्यात करण्यात आलेला ऑक्सिजनचा साठा द्रवरुपात होता. त्याचा वापर औद्योगिक आणि वैद्यकीय कारणांसाठी केला जाऊ शकत होता. अशी माहिती आणि आकडेवारी वाणिज्य विभागाने दिली आहे.

दरम्यान, भारतातील निर्यात करण्यात आलेल्या एकूण ऑक्सिजनपैकी बांगलादेशला तब्बल ८ हजार ८२८ मेट्रिक टन ऑक्सिजन भारताकडून देण्यात आला. गेल्या काही वर्षांपासून बांगलादेश भारताकडून आयात करत असलेल्या ऑक्सिजनचं प्रमाण कमी कमी होत गेलं. मात्र कोरोना संकट येताच बांगालदेशानं ऑक्सिजनची मागणी वाढवली होती. प्रारंभी बांगलादेशानं साधारण औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन मागवला. मात्र त्यानंतर बांगलादेश वैद्यकीय कारणांसाठी ऑक्सिजनची आयात करत असल्याचे समोर आले आहे.