न्यूयॉर्क टाईम्सचा मोठा दावा, म्हणाले – ‘भारतात कोरोनाच्या मृतांचा आकडा लपवला जातोय, खरी संख्या पाचपट’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने ऑक्सिजन, औषधांचा तुटवडा सर्वच राज्यात जाणवत आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून दररोज 2 हजारहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू आहे. देशातील अनेक राज्यांमधील स्मशानभूमींमध्ये येणाऱ्या मृतदेहांचा आकडा आणि प्रशासनाकडे असलेली मृतांची आकडेवारी यात खूप मोठी तफावत आहे. प्रशासन आणि राजकारणी मिळून कोरोना मृतांचा आकडा लपवत असून खरी संख्या पाचपट असल्याचे न्यूयॉर्क टाईम्सने म्हटले आहे. दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत देशात कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 1 लाख 95 हजार 123 इतकी आहे. मात्र न्यूयॉर्क टाईम्सच्या दाव्यानुसार ती 4 ते 10 लखाच्या आसपास असू शकते.

मिशिगन विद्यापीठात साथीचे रोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या भ्रमर मुखर्जींनी भारतातील कोरोना मृतांचा आकडा 2 ते 5 पट असल्याचा दावा केला आहे. अहमदाबादमधील सर्वात मोठ्या स्मशानभूमीत सध्या दिवसरात्र अंत्यसंस्कार आहेत. मात्र कोरोनामुळे मृत्यू झालेले असतानाही अनेकांच्या मृत्यूचे कारण आजारपण असे नोंदवले गेले आहे. मृतदेह अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्यांची नोंद ठेवताना शक्यतो कोरोनाचा उल्लेख करू नका, अशा सूचना स्मशानभूमीत काम करत असलेल्यांना वरिष्ठांकडून दिल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच 80 च्या दशकात भोपाळमध्ये वायूगळती झाली. त्यात हजारो जणांचा बळी गेला. त्यानंतर प्रथमच भोपाळमधल्या स्मशानभूमींत मोठ्या प्रमाणात अंत्यसंस्कार होत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. एप्रिलच्या मध्यात 13 दिवसांमध्ये भोपाळमध्ये 41 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. मात्र भोपाळमधील मुख्य स्मशानभूमी आणि कब्रस्तानात कोरोना प्रोटोकॉलसह अंत्यसंस्कार झालेल्यांचा आकडा 1 हजाराच्या पुढे असल्याचे न्यूयॉर्क टाईम्सने म्हटले आहे.